

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पहिली आंतरराष्ट्रीय आयुर्वेद आणि वेलनेस एक्स्पो आणि समिट २०२६ ची पहिली आवृत्ती २३ जानेवारी ते २५ जानेवारी २०२६ दरम्यान डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम येथे आयोजित केली जाणार आहे.
हा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कार्यक्रम गोवा कौन्सिल ऑफ आयुर्वेदिक अँड अदर अलाइड इंडियन सिस्टीम्स ऑफ मेडिसिन आणि गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने, पतंजली रिसर्च फाउंडेशनच्या सहकायनि आयोजित केला जात असल्याची माहिती गोवा कौन्सिल ऑफ आयुर्वेदिक अँड अदर अलाइड इंडियन सिस्टीम्स ऑफ मेडिसिनच्या अध्यक्षा डॉ. स्नेहा भागवत यांनी दिली.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी आयोजन समिती सदस्य उपस्थित होते. यामध्ये डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई (उपाध्यक्ष), डॉ. देवदत्त सैल (संघटन सचिव), डॉ. मिनल जोशी, डॉ. जॉय परेरा, डॉ. महेश वेर्लेकर आणि डॉ. रिटा एम. डिसोझा ई वाझ आणि डॉ. नीलेश कोरडे यांचा समावेश होता.
हा एक्स्पो आणि समिट आयुर्वेद, आयुष प्रणाली, सर्वांगीण आरोग्य, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच गोव्याला जागतिक आरोग्य पर्यटन नकाशावर एक प्रमुख व्यासपीठ म्हणून पुढे अतिशय महत्वाची भूमिका बजावणार आहे.
२३ जानेवारीला केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, सदगुरू ब्रम्हेषानंद आचार्य स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडेल. या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात देशभरातील दिग्गजांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहे.