

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील पारंपरिक मिठागर शेती हा गोव्याच्या सांस्कृतिक आणि आर्थिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे मिठागरे जपण्यासाठी राज्य सरकार लवकरच स्वतंत्र आणि समर्पित योजना सुरू करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात अस्मिताय दिन कार्यक्रमात डॉ. सावंत बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्य सचिव व्ही. कांडावेलू, सचिव प्रसाद लोलयेकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, मिठागर शेती क्षेत्राचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन करणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे.
मिठागर शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडून ओळखपत्रे देण्यात आली आहेत. त्यांच्या उपजीविकेला आधार मिळावा यासाठी ५० हजार रुपयांची आर्थिक मदतही वितरित करण्यात आली आहे.
या मदतीमुळे मिठागारांचे संरक्षण, देखभाल तसेच पारंपरिक पद्धतीने मीठ उत्पादन सुरू ठेवण्यास शेतकऱ्यांना हातभार लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, वाढते शहरीकरण, जमीन रूपांतरण आणि बदलती जीवनशैली यामुळे मिठागर शेती धोक्यात आली आहे.
प्रस्तावित योजनेअंतर्गत मिठागर जमिनींचे संवर्धन, अतिक्रमण रोखणे, पारंपरिक पायाभूत सुविधांचे पुनरुज्जीवन आणि मिठागर शेतकऱ्यांच्या सामाजिक-आर्थिक सुरक्षिततेवर भर दिला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. या कार्यक्रमाला क्युरेटर सुलक्षा कोळमुळे, दुर्मीळ पुस्तक विभागाच्या प्रभारी नेहा ठाणेकर, वरिष्ठ ग्रंथपाल प्रशांत फडते आणि ग्रंथपाल बनडिटा अल्झिरा डिसोझा व्यासपीठावर उपस्थित होते.
मध्यवर्ती ग्रंथालयात व्याख्यान
पणजी : येथील राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या चौथ्या मजल्यावरील दुर्मीळ पुस्तक विभागात, गोवा जनमत चाचणी दिनानिमित्त एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ संजीव सरदेसाई यांनी यावेळी विद्यार्थ्यांना गोव्याच्या गौरवशाली इतिहासाची सफर घडवून आणली.