

गोवा कर्मचारी भरती आयोगामार्फत ९५ तरुण-तरुणींना नियुक्तीपत्रे प्रदान.
मेरिटवर नोकरी मिळाल्यानंतर सेवाभावनेने काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन.
वशिलेबाजी व भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आयोगाची स्थापना.
गोव्यातील युवांनी IAS, IPSसारखी मोठी स्वप्ने पाहावीत, असे मार्गदर्शन.
पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा सरकारने पात्र व हुशार युवांना नोकरी मिळावी आणि प्रशासन गतिमान व्हावे, सर्वसामान्य लोकांना चांगली सेवा मिळावी, भ्रष्टाचारावर अंकुश यावा यासाठी गोवा कर्मचारी भरती आयोग स्थापन केलेला आहे.
स्वतःच्या मेरिटवर नोकरी मिळवणाऱ्या युवांनी नोकरीत रुजू झाल्यानंतर लोकांचे सेवक म्हणून काम करावे, पदाचा गैरवापर करू नये व आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. आज, गुरुवारी पर्वरी येथील मंत्रालयात गोवा कर्मचारी भरती आयोगातर्फे सार्वजनिक बांधकाम खात्यात तांत्रिक साहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता या पदासाठी निवड झालेल्या ९५ तरुण-तरुणींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली.
यावेळी साबांखात्याचे मंत्री दिगंबर कामत, मुख्य सचिव डॉ व्ही. कांडावेलू, साबांखात्याचे प्रधान मुख्य अभियंते उत्तम पार्सेकर व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. सावंत म्हणाले की, आयोगामार्फत सरकारी नोकरी मिळाल्यानंतर सेवाभावनेने काम करा, गोवा कर्मचारी भरती आयोगाची तांत्रिक विभागातील ही पहिलीच बेंच आहे.
पात्र मुलांना नोकरी मिळावी हाच हेतू ठेवून आपण आयोगाची स्थापना केली आहे, पुन्हा पुन्हा परीक्षा देण्याची पाळी उमेदवारावर येऊ नये. एक किंवा दोन परीक्षा दिल्यानंतर कुणाचा वशिला न लावता फक्त स्वतःच्या हुशारीवर नोकरी मिळावी अशी अनेक युवांची मागणी होती. त्यांची मागणी आपण आयोग स्थापून मान्य केली आहे.
शंभर टक्के पारदर्शकपणे ही नोकरभरती होत असल्याचे सांगून गोव्यातील जे पदवीधर आहेत त्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत. लोकसेवा आयोगाच्या परीक्षा द्याव्यात, आयपीएस, आयएएस व्हावे असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले. पूर्वीच्या काळी सरकारी नोकरीसाठी उमेदवारांना अनेकांचे उंबरठे झिजवावे लागत होते, वशिलेबाजीने नोकर भरती झाल्यानंतर भ्रष्टाचाराला वाव मिळत होता. मात्र आता पात्र मुलांनाच नोकरी मिळणार आहे. ज्यामुळे प्रशासन सुरळीत होतानाच भ्रष्टाचाराला अंकुश बसेल.
नोकरीसाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. नोकरीला लागल्यानंतर आपले काम चोख ठेवून सर्वसामान्यांचा सन्मान करावा आणि गरिबांना चांगल्यात चांगले प्रशासन देऊन मदत करावी, असे आवाहन कामत यांनी यावेळी केले.
... म्हणून वशिल्याशिवाय नोकरी :
कामत गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वसामान्यांना कोणत्याही वशिल्याशिवाय फक्त मेरिटवर नोकरी मिळत आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्थापन केलेला गोवा कर्मचारी भरती आयोग. सरकारी नोकरी फक्त हुशार व पात्र उमेदवारांना मिळत आहे, हा ऐतिहासिक क्षण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता चांगला अभ्यास करावा, असे मंत्री कामत म्हणाले.