

पणजी : पुढारी वृत्तसेवा
न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांच्या नेतृत्वाखाली ६ जानेवारी रोजी पणजी येथे झालेल्या सभेत नगर नियोजन कायद्यातील विविध कलमांसह मांडवी नदीतील कॅसिनो हटवण्याची जोरदार मागणी झाली होती. त्यानंतर गुरुवारी न्या. रिबेलो यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची मंत्रालयात भेट घेऊन सभेतील मागण्या त्यांच्या समोर ठेवल्या. ज्यात मांडवीतील कॅसिनो हटवण्याची मागणीही आहे.
प्राप्त माहितीनुसार, मांडवी नदीत सध्याच्या घडीला सहा कॅसिनो असून, त्याद्वारे वर्षाला गोवा सरकारला ७०० ते ८०० कोटी रुपये एवढा महसूल मिळतो. न्या. रिबेलो व लोक चळवळीची मागणी मान्य करायची झाल्यास सरकारला वार्षिक ८०० कोर्टीच्या महसुलाला मुकावे लागेल. त्यामुळे न्या. रेबेलो यांच्या मागणीनंतर सरकार पेचात सापडले आहे. काँग्रेसच्या काळात पहिला कॅसिनो मांडवीत दाखल झाला. त्यानंतर त्यांची संख्या वाढत गेली.
मांडवी नदीचे पात्र कॅसिनोमुळे प्रदूषित झालेले आहे. कॅसिनोमध्ये अनेक गैरप्रकार होत असल्याची चर्चा आहे. लोक चळवळीच्या मागणीनुसार मांडवीतील कॅसिनो बंद केले तर सरकारला करोडो रुपयांच्या महसुलास मुकावे लागेल. त्याच बरोबर तेथे काम करणाऱ्या गोमंतकीय कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. अशा दुहेरी कात्रीत आता सरका सापडले आहे.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या काळामध्ये लाडली लक्ष्मी, गृह आधार दयानंद सामाजिक सुरक्षा अशा अनेक योजना सुरू करण्यात आल्या होत्या, त्या योजना सुख्ख ठेवण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणाव निधीची गरज आहे. कॅसिनोच्या माध्यमातून मिळणारा ७०० ते ८०० कोटींचा वार्षिक महसूल बंद झाला तर त्याचा परिणाम या योजनांवर होण्याची शक्यता यापूर्वी अनेकदा व्यक्त झालेली आहे. कॅसिनोमध्ये बहुतांश कर्मचारी परराज्यातील असले तरी गोवेक कर्मचाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे.
जुनी कॅसिनो जहाजे खोल समुद्रात नेणे धोकादायक
न्यायमूर्ती रिबेलो आणि लोक चळवळीची मागणी ही मांडवीतून कॅसिनो हटवा ही आहे. यापूर्वी विधानसभेत ही कॅसिनो जहाजे खोल समुद्रात नेण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली होती. त्यानुसार कॅसिनो जहाजे खोल समुद्रात नेली तर ती तेथे सुरक्षित राहतील का हा प्रश्न आहे, कारण अनेक वर्षे एकाच जागी नांगरून ठेवलेली ही जहाजे जुनी झालेली असल्याने खोल समुद्रात कॅसिनो नेण्याचा निर्णय झाला तर कॅसिनो कंपनींना नवीन जहाजे आणावी लागतील, त्यामुळे सरकार मांडवीतील कॅसिनोंबाबत कोणता तोडगा काढते त्याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.