

पणजी : प्रभाकर धुरी
संगीत आणि नृत्यातून पर्यटकांचे मनोरंजन करणारा हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन हा क्लब आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आणि पर्यटकांच्या उत्साहाचा, त्यांचा जल्लोषाचा जणू शेवटच झाला. एरवी क्लबमध्ये सतत असलेली माणसांची वर्दळ, वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा सुटणारा दरवळ, रेस्टॉरंटमधील टेबलांवरील गप्पांचा, संगीताचा आणि स्टेजवरील नृत्यांगनांच्या पदन्यासाचा घुमणारा आवाज आता शांत झाला.
आता तिथे उरली आहे फक्त स्मशान शांतता. नाही म्हणायला राखेचे ढिगारे, जळालेल्या साहित्याचे भग्न अवशेष आणि आगीच्या तडाख्यात सापडलेल्या इमारतीच्या भिंती यांच्या देखरेखीसाठी पोलिसांचा बंदोवस्त आणि अधिकाऱ्यांची रेलचेल आज, सोमवारीही होती.
एका ठिणगीने कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या साम्राज्याची एका क्षणात राखरांगोळी केली. स्वयंपाकघरातील भांडी आणि स्टोरेज उपकरणे, रेफ्रिजरेशन युनिट्स, एअर कंडिशनिंग युनिट्स, इलेक्ट्रिकल वायरिंग सिस्टीम, पंखे आणि प्रकाशयोजना, लाकडी संरचना आणि विभाजने, खिडक्या, शटर आणि रिसेप्शन फर्निचर, बार काउंटर, टेबल, खुर्चा आणि टेलिव्हिजन आदी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
सगळीकडे राखेचे ढिगारे, लोखंडी साहित्याचे भग्न अवशेष, जळाल्याने रया गेलेले अँटिक पीस दिसत होते. आग लागल्याची माहिती क्लबमधील कर्मचारी सुब्रा याने म्हापसा अग्निशमन दलाला रात्री ११.४५ मिनिटांनी दिली. आग पूर्ण आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला ४.४५ तास लागले. तळमजला आणि तळघर या साधारण ३०० चौरस मीटर क्षेत्रात ही आग पसरली होती. ती आटोक्यात आणायला पहाटेचे साडेचार वाजले होते. एवढा वेळ क्लब जळत होता.
अग्निशमन दलाचे जवान येईपर्यंत आग सगळीकडे पसरली होती. स्थानिक लोक मदतीसाठी धावले. या ठिकाणी क्लबला लागून मायझन द लेक व्हा नावाचे हॉटेल आहे. स्थानिक युवकांनी धाव घेतली. मात्र, हे हॉटेल आणि क्लब यांच्या मधल्या वाटेवर असलेल्या लोखंडी गेटला कुलूप होते. ते तोडण्याचा प्रयत्न स्थानिकांनी केला, तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले आणि २५ निष्पापांचे जीव गेले, अशी आठवण एका स्थानिक युवकाने सांगितली.
२५ जणांच्या स्वप्नांचीही राखरांगोळी
या आगीत २५ जणांचा बळी गेला. त्यात २० जण क्लबमधील कर्मचारी होते, तर ५ पर्यटक होते. कर्मचारी उत्तराखंड, नेपाळ, झारखंड, आसाम, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील, तर पर्यटकांमधील १ पर्यटक कर्नाटकातील व ४ पर्यटक दिल्लीमधील होते. या सगळ्यांनी गाव सोडून येताना अनेक स्वप्ने पाहिली असतील. त्यांच्याही आशा-आकांक्षा असतील. मात्र, या आगीने क्षणात होत्याचे नव्हते केले आणि त्यांची स्वप्ने राखेत मिसळली.
एक एक टेबल लाखाचे...
एका स्थानिक युवकाने दिलेल्या माहितीनुसार, या क्लबमध्ये शनिवार, रविवारी ५०० - १००० पर्यटक देशातील वेगवेगळ्या शहरातून यायचे. ते श्रीमंत आणि अतिश्रीमंत वर्गातील असायचे. विदेशींची संख्या फार नसायची. मात्र, क्लबमधील टेबलावर बसणाऱ्या पर्यटकांचे प्रत्येक टेबलचे बिल लाख किंवा लाख रुपयांपेक्षा अधिक असायचे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेला क्लब आता पुन्हा उभा राहील की नाही हे सांगता येणार नसले, तरी त्यात बळी गेलेल्या २५ जणांची आठवण मात्र चिरकाल स्मरणात राहील.