FDA Goa | एफडीएतर्फे राजधानीत 23 ठिकाणी छापे
पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील भेसळयुक्त अन्नपदार्थांवर आळा घालण्यासाठी एफडीएतर्फे विविध मोहिमा राबवण्यात येतात. याच पार्श्वभूमीवर संचालिका श्वेता देसाई आणि उत्तर गोव्याचे अधिकारी रिचर्ड नोरोन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या एफडीए पथकाने १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी पणजीमधील खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये अंमलबजावणी मोहीम राबवली.
यामध्ये २३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. विभागाच्या माहितीनुसार, स्वच्छता आणि आरोग्यविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे मूल्यांकन करण्यासाठी २३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. अनेक दुकानांना किरकोळ नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे. तर अन्न सुरक्षेतील गंभीर त्रुटींमुळे ३ दुकाने बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेत. सर्व दुकानांना तपासणी अहवाल देण्यात आला आहे.
पणजीमधील अनेक नामांकित दुकानांमध्ये योग्य वैध सॅनिटरी कार्ड नसलेले कर्मचारी खाद्यपदार्थ हाताळण्यासाठी कामावर ठेवण्यात आल्याचे दिसून आले. अशा सर्व विक्रेत्यांना वैध सॅनिटरी कार्ड मिळेपर्यंत अन्न हाताळण्यापासून रोखण्यात आले. एफएसएसआय नोंदणी प्रमाणपत्रावर कार्यरत असलेल्या दुकानांना ७ दिवसांच्या आत योग्य परवाना मिळवण्याचे निर्देश देण्यात आले.

