

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
फेसबुकवर 'एरियाना जोनाथन' या नावाने बनावट प्रोफाइल तयार करून विवाहाचे आमिष दाखवत कुडचडे येथील एका व्यक्तीकडून ३ लाख ३५ हजार ७२० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी केपे पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडचडे येथील अल्वेस पलासिदो फर्नांडिस यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी केपे बाजार परिसरात असताना 'एरियाना जोनाथन' या नावाच्या फेसबुक प्रोफाइलवरून एका अज्ञात महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला. संबंधित महिलेने फेसबुकवरून त्यांचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यांच्याशी व्हॉट्सअॅपवर संवाद सुरू केला. संवादादरम्यान त्या महिलेने आपण लंडन येथे राहत असून गोव्यात भेटण्यासाठी येणार असल्याचे सांगितले.
तसेच तिने फर्नांडिस यांच्याशी जवळीक वाढवत लग्नाचा प्रस्ताव दिला. काही दिवस संवाद सुरू ठेवल्यानंतर ६ मार्च २०२६ रोजी फर्नांडिस यांना एक फोन आला. फोन करणाऱ्याने संबंधित महिला दिल्ली विमानतळावर पोहोचली असून 'एअरपोर्ट क्लिअरन्स'साठी तातडीने पैसे आवश्यक असल्याचे सांगितले.
या गोष्टींवर विश्वास ठेवून फर्नांडिस यांनी आरोपींनी दिलेल्या बँक खात्यांवर तसेच गुगल पेच्या माध्यमातून एकूण ३,३५,७२० रुपये पाठवले. हे पैसे मनु कुमार, अभय सिंग आणि अंकित कुमार या नावांवर असलेल्या खात्यांमध्ये जमा करण्यात आले.