

हरमल / पणजी : पुढारी वृत्तसेवा
हरमल येथे एका दुचाकीस्वाराला भर रस्त्यात चक्क वाघाने दर्शन दिले आणि गोव्यात वाघ असल्याच्या शक्यतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. हरमल देऊळवाडा येथील श्री रवळनाथ मंदिर ते मिठागर रस्त्यावर पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास वाघाचे दर्शन झाल्याने प्रत्यक्षदर्शी नागरिकांची बोबडी वळली.
वाघ चक्क विद्युत दिव्यांच्या प्रकाशात रस्त्यावरून चालत होता. काही क्षण रस्त्यावर थांबल्यानंतर तो जंगलाच्या दिशेने निघून गेला. शनिवार, १४ रोजी पहाटे एका दुचाकीस्वाराला अचानक वाघ दिसला.
तो घाबरून वाघापासून काही अंतरावर थांबला. मात्र, काहीवेळाने वाघ जंगलाच्या दिशेने निघून गेला. हा थरारक अनुभव त्याने कॅमेऱ्यातही कैद केला आणि गोव्यात वाघ आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. दरम्यान, या भागात बिबट्यांचाही वावर होता. गेल्या वर्षी बिबट्याने दोन कुत्र्यांचा तसेच एका वासराचा फडशा पाडल्याची घटना घडली होती.
त्या वेळी नानोसकरवाडा येथे तुये वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याला पकडले होते. त्यानंतर काहीकाळ या भागात बिबट्याचा वावर दिसून आला नव्हता. मात्र, आता चक्क वाघोबाचे दर्शन झाल्याने नागरिकांची झोप उडाली आहे.
कृष्णा नाईक यांनी सांगितले की, देऊळवाडा परिसरात पाण्याचे स्रोत असल्यामुळे वाघ जंगलातून पाण्यासाठी खाली उतरला असावा. वाघाचा वावर अनपेक्षित असल्याने लहान मुले व ग्रामस्थांना रात्री उशिरापर्यंत घराबाहेर थांबणे धोकादायक ठरू शकते, असेही नाईक यांनी सांगितले.
हरमलमध्येही व्याघ्रगणनेची गरज
२०२२-२३ च्या अहवालानुसार गोव्यात वाघांची संख्या ५ होती. २०१८ मध्ये हीच संख्या ३ झाली. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागात म्हादई अभयारण्य आहे. अहवालानुसार, गोव्यात २०१४ मध्ये ५, २०१८ मध्ये ३, २०१९ मध्ये ५ वाघ होते. २०२४ पर्यंत वाघांचे गोव्यात अस्तित्व असल्याचे अनेक पुरावे आहेत. शिवाय आता अखिल भारतीय व्याघ्र गणना सुरू झाली आहे.
महाराष्ट्रात याचा पहिला टप्पा सुरू झाला असून, गोव्यातही व्याघ्र गणना होणार आहे. त्यानंतर वाघांच्या अस्तित्वाचे पुरावे मिळतील. यापूर्वी गोवा सरकार गोव्यात वाघ नाहीत, असा दावा करत होते. मात्र, गोळावली जंगलात चार वाघांची विष घालून निर्दयीपणे हत्या करण्यात आली आणि सरकारला वाघाचे अस्तित्व मान्य करावे लागले. आता तर हरमल सारख्या भागात वाघाचे अस्तित्व आढळले आहे.
गोव्यात या महिन्यात व्याघ्रगणना सुरू होणार आहे. त्यात पश्चिम घाटातील म्हादई परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात येतील. मात्र, आता वन विभागाला हरमल परिसरातही ट्रॅप कॅमेरे लावणे, चिन्ह सर्वेक्षण करणे, पदचिन्हांचे निरीक्षण करणे या गोष्टी कराव्या लागतील. वाघाची विष्ठा, त्याच्या पाऊलखुणा, झाडावरील ओरखडे अशा चिन्हांची माहिती गोळा करावी लागेल. अशा प्रकारच्या व्याघ्रगणनेतून गोव्यात किती व कुठे वाघ आहेत याची शास्त्रीय माहिती गोळा होणार आहे.
गव्याचा असाही प्रताप...
या परिसरात गव्यांचा वावर वाढू लागल्याने बागायतदार आणि ग्रामस्थांमध्ये भीती वाढली आहे. गेल्या आठवड्यात शेतकरी पार्सेकर यांची जर्सी गाय गव्याच्या हल्ल्यात ठार झाली होती. त्याचा शेतकऱ्यांनी धसका घेतला असून सरकार आणि वनखात्याने पर्यावरण संरक्षण व वन्य प्राणी बंदोबस्तासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.