

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
मांद्रे विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा कमळ फुलवण्याचा निर्धार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला असतानाच, आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे मांद्रेचे विद्यमान आमदार जीत आरोलकर यांनाच भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांच्या माध्यमातून मांद्रेत कमळ फुलवणार काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. ही चर्चा केवळ मांद्रे मतदारसंघापुरती मर्यादित राहिलेली नसून संपूर्ण गोव्यातील राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटत आहेत.
एकीकडे मांद्रे मतदारसंघात भाजपचे कमळ फुलवण्याचे आवाहन मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ नेते सातत्याने करत आहेत, तर दुसरीकडे आमदार जीत आरोलकर आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यातील वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे भाजपची मांद्रेतील नेमकी रणनीती काय? स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना संधी मिळणार की बाहेरून आयात उमेदवार आणला जाणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मांद्रे मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा कमळ फुलवण्यासाठी संघटनात्मक पातळीवर हालचाली सुरू केल्या. माजी आमदार दयानंद सोपटे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच पक्षाच्या विविध वरिष्ठ नेत्यांनी वेळोवेळी कार्यकर्त्यांच्या बैठका आणि सभांमधून मांद्रेत भाजपला पुन्हा विजय मिळवून देण्यासाठी सक्रिय होण्याचे आवाहन केले.
प्रत्येक बैठकीत मांद्रे मतदारसंघात भाजपचे कमळ फुलवण्याचा निर्धार व्यक्त होत असल्याने स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले आहे. मात्र, या आवाहनामागे नेमकी कोणती उमेदवारी रणनीती आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने राजकीय चर्चाना वेग आला आहे. माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भाजपमध्ये घरवापसी केल्यानंतर मांद्रे मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
त्यांच्या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मांद्रे मतदारसंघात पुन्हा एकदा कमळ फुलवण्याचे आवाहन केले. पार्सेकरांसारख्या अनुभवी नेत्याचे भाजपमध्ये पुनरागमन झाल्यामुळे मांद्रेतील भाजपच्या राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले. त्यानंतर विविध बैठका आणि सभांमधून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना एकत्र येऊन भाजपचा विजय निश्चित करण्याचे आवाहन केले. मात्र, पार्सेकरांच्या पुनरागमनानंतर भाजपची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार, हा प्रश्न पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी पार्से, खाजन, गुंडो आणि बांद या भागांत आयोजित केलेल्या भव्य दीपोत्सव कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमातील मुख्यमंत्र्यांची उपस्थिती आणि आमदार आरोलकर यांच्याबद्दल त्यांनी व्यक्त केलेले कौतुक यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली. मुख्यमंत्री आणि आमदार आरोलकर यांच्यातील जवळीक यापूर्वीही अनेकदा चर्चेत आली आहे.
दीपोत्सवाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी आरोलकर यांच्याबाबत व्यक्त केलेल्या विश्वासपूर्ण वक्तव्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आमदार जीत आरोलकर यांना भाजपमध्ये आणण्याच्या विचारात आहेत काय? त्यांना भाजपची उमेदवारी देऊन मांद्रेत कमळ फुलवण्याची रणनीती आखली जात आहे काय? असे प्रश्न आता राजकीय चर्चेत पुढे येत आहेत. मात्र, आरोलकर यांच्या भाजप प्रवेशाबाबत किंवा उमेदवारीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
पक्षातील स्थानिक नेत्यांना प्रोत्साहन द्यायचे, पार्सेकरांसारख्या अनुभवी नेत्याला पुन्हा सक्रिय करायचे की जीत आरोलकर यांच्यासारख्या विद्यमान आमदाराला भाजपमध्ये घेऊन निवडणुकीची गणिते बदलायची, हा भाजपसमोरील महत्त्वाचा प्रश्न ठरू शकतो. त्यामुळे भाजपचे नेतेच आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक नेत्यांमध्ये स्पर्धा निर्माण करत आहेत काय, अशी चर्चा देखील समाज माध्यमांवर रंगू लागली आहे.
'भिवपाची गरज ना!' मग नेमके कुणाला ?
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वक्तव्यांमधील 'भिवपाची गरज ना' हा संदेशही आता मांद्रेच्या राजकीय चर्चेत वेगळ्या अर्थान चर्चिला जात आहे. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांद्रेतील भाजपच्या इच्छुक उमेदवारांमध्ये खऱ्या अर्थाने कुणाला राजकीय आव्हानाची भीती वाटण्याची गरज आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
पेडणेकार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
मांद्रेतील सध्याचे राजकीय चित्र पाहता भाजपसमोर एक वेगळाच पेच निर्माण झाल्याचे दिसते. एका बाजूला माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांची घरवापसी झाली आहे. दुसऱ्या बाजूला माजी आमदार दयानंद सोपटे भाजपचे संघटनात्मक काम पुढे नेत आहेत. तिसऱ्या बाजूला विद्यमान आमदार जीत आरोलकर आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यातील जवळीक चर्चेत आहे. अशा परिस्थितीत भाजपचे वरिष्ठ नेते वारंवार मांद्रेत कमळ फुलवण्याचे आवाहन करत असताना नेमका उमेदवार कोण असेल, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होणे स्वाभाविक आहे.