

... त्यांना रोमी कोकणी मान्य आहे का?
लोहिया मैदान मडगाव येथे रविवारी एक जाहीर सभा झाली. त्यामध्ये बहुतांश रोमी कोकणी समर्थकांची म्हणजे अल्पसंख्याक नागरिकांची उपस्थिती होती. या सभेमध्ये मराठी राजभाषेची मागणी करणाऱ्यांवर टीका करण्यात आली, आणि देवनागरी कोकणी सोबत रोमी कोकणी ही राजभाषा व्हायला हवी अशी मागणी करण्यात आली. रोमी कोकणीवाले अल्पसंख्याक नागरिक नेहमीच देवनागरी कोकणीवाल्यांनी आम्हाला फसवले, असा आरोप करतात. काल तर त्यांनी जाहीर मागणीच केली. या मागणीवर देवनागरी कोकणीप्रेमी मात्र गप्पच आहेत, त्यांना रोमी कोकणी राजभाषा चालेल का, ते त्यांनी सांगावे.
आता मारहाण करण्याची धमकी
देवनागरी कोकणी प्रेमी मराठी राजभाषा आंदोलनामुळे बरेच चवताळलेले दिसतात, मराठी राजभाषेची मागणी करणारे देवनागरी कोकणी आम्हाला हवी, ती राजभाषा राहू द्या, आमचा तिला विरोध नाही. पण, तिच्यासोबत मराठीही राजभाषा करा, अशी मागणी करत आहेत. मात्र, देवनागरी कोकणी समर्थक जे मराठीतून शिकले आहेत, ते सोशल मीडियावर पोस्ट टाकून मराठी राजभाषेची मागणी करणाऱ्यांना आता बडवायला हवे, अशा प्रकारची विधाने करत आहेत. मराठीप्रेमी काही असंवैधानिक मागणी करत आहेत का?
तेव्हा गप्प का राहतात?
अल्पसंख्याक समाजाच्या संदर्भात कुणी काही बोलला की स्वतःला सेक्युलर म्हणणारे पुढे येऊन त्याचा निषेध करतात. वास्को येथे आयोजित एका कार्यक्रमात ख्रिश्चन बांधवांच्या भावना दुखावणारे विधान एका गोव्याबाहेरील वक्त्याने केले होते. त्यामुळे गोव्यात विनाकारण धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते. त्याच्या विरोधात एफआयआर दाखल झाला आहे. सेक्युलर म्हणणारे मोठ्या प्रमाणात सदर वक्त्याचा निषेध करत आहेत. मात्र, याच सेक्युलर व्यक्ती ज्यावेळी हिंदू देवता किंवा श्रध्दास्थानावर कुणी टीका करते, त्यावेळी मूग गिळून गप्प राहतात, हा त्यांचा दुटप्पीपणा नव्हे का?
आम्ही गोमंतकीय एकत्र !
आक्षेपार्ह भाष्य केल्याप्रकरणी सध्या गौतम खट्टरविरोधात संतापाची लाट उसळली असून, गोव्यात धार्मिक विषयांवर बोलण्यासाठी बाहेरून येणाऱ्या काही सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरबाबत सावध राहण्याची गरज आ वैयक्तिक प्रभाव निर्माण करण्याच्या प्रयत्नात गौतम खट्टरसारख्या व्यक्तींमुळे स्थानिक पातळीवर सामाजिक विसंवाद निर्माण होऊ शकतो. गोव्यातील लोकांनीच परस्पर सौहार्द, सहिष्णुता आणि पर्यटनासारख्या आर्थिक विकासाचा समतोल कसा राखायचा हे जगाला दाखवून दिले आहे. त्यामुळे बाहेरच्यांकडून शिकण्यापेक्षा त्यां गोव्याकडून शिकावे, असा इशारा विजय सरदेसाई यांनी दिला. आपण सर्व गोमंतकीय एकत्र आहोत, आपले घट्ट आहे आणि फूट पाडण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना आपण एकजुटीने विरोध करू, असे आवाहनही त्यांनी केले.
खरे दुःख वेगळेच आहे
गोव्यात गेल्या काही वर्षापासून आध्यात्मिक कार्यक्रम वाढले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आध्यात्मिक कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहत असून प्रोत्साहनही देत आहेत. कांपाल येथे मांडवीच्या किनारी त्यांच्या काळातच भगवान परशुरामाचा पुतळा उभारण्यात आला, त्यावेळी अनेकांनी टीका केली होती. आता तर भगवान परशुराम जयंतीनिमित्त भव्य असे कार्यक्रम त्या ठिकाणी होत आहेत. त्यामुळे सेक्युलर चवताळले असून त्यांना स्पष्टपणे विरोध करता येत नसल्याने ते दुसऱ्या प्रकरणाचा बाऊ करून सरकारवर टीका करत आहेत.
मडगाव पालिकेचे अपयश रडारवर
सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत आणि मॉडेल मडगाव या स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख असलेले त्यांचे पुत्र योगिराज कामत यांना, श्वानांचे निर्बीजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरणाची तीन आठवड्यांची मोहीम सुरू केल्याबद्दल नक्कीच कौतुकाची थाप मिळेल. मडगावमध्ये भटक्या श्वानांची संख्या आणि श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, हा उपक्रम म्हणजे अत्यंत निकडीची आणि वेळेवर झालेली कृती ठरली आहे. याउलट, मडगाव नगरपालिकेला मात्र गेल्या पाच वर्षांत या समस्येचे प्रभावीपणे निराकरण करण्यात आलेल्या अपयशामुळे टीकेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. २०२१ पासून शहरात निर्बीजीकरण कार्यक्रम म्हणावा तसा का रुजू शकला नाही, यावर आता प्रश्न उपस्थित होणे अटळ आहे.