

पणजी : जिल्हा पंचायत निवडणूक 20 डिसेंबर रोजी होणार असून शनिवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन राज्य निवडणूक आयुक्त मिनीनो डिसोझा यांनी निवडणूक जिल्हा पंचायत निवडणूक कार्यक्रम व आचारसंहिता जाहीर केल्यानंतर संध्याकाळी राज्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावून त्यांची बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी फक्त सात दिवस मिळत असल्याबद्दल विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.
बैठकीनंतर गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस (संघटन) दुर्गादास कामत यांनी सांगितले की, 1 ते 9 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यानंतर 10 रोजी छाननी व 11 रोजी अंतिम यादी जाहीर होणार आहे. त्यात फक्त 7 दिवस प्रचारासाठी मिळणार आहेत. या 7 दिवसांत किमान प्रत्येक जिल्हा पंचायत मतदारसंघात असलेल्या 5 ते 6 पंचायतींत उमेदवार घरोघरी जाऊ शकणार नाही. त्यामुळे त्याला कोपरा बैठका किंवा लहान-लहान सभा घेऊन प्रचार करावा लागेल. 15 ते 20 दिवस उमेदवारांना प्रचारासाठी हवे होते, त्यामुळे ही निवडणूक घाईगडबडीत होत आहे, असे त्यांनी सांगितले.
त्या प्रकारांविरोधात तक्रार : दुर्गादास कामत
भाजपचे उमेदवार जिंकलेल्या जागी आपल्या पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. गाठीभेटी देण्यास सुरुवात केली आहे. आम्ही तीन जाहीर सभाही घेतलेल्या आहेत. सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना धमक्या देण्याचे प्रकार होत आहेत, याची जाणीव राज्य निवडणूक आयुक्तांना करून दिली आणि त्या विरोधात कारवाईची मागणीही केली, असे गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत यांनी सांगितले.
घाईगडबडीत निवडणूक घेण्याचा प्रकार : ॲड. तिळवे
आपचे प्रतिनिधी ॲड. सुरेल तिळवे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा शुक्रवारी होती, त्यामुळे निवडणूक आचारसंहिता जाहीर करायला उशीर केला. ती काल शुक्रवारी केली असती, तर त्या सभेचा खर्च भाजप उमेदवारांच्या खात्यात गेला असता, त्यामुळे सत्ताधारी पक्ष हवा तसा निर्णय घेते. फक्त 7 दिवस प्रचारासाठी ठेवून ही निवडणूक घाईगडबडीत घेणे योग्य नसल्याचे सांगून आपने यापूर्वीच काही उमेदवार जाहीर केलेले असल्यामुळे त्यांनी प्रचारही सुरू केला आहे, असे ते म्हणाले.