

पणजी ः गोव्यातील सर्व राजकीय पक्ष येणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीची तयारी करत असताना, निवडणुका घेण्याची जबाबदारी असलेले राज्य निवडणूक आयोग मात्र गोंधळात व पडद्याआड काम करत असल्याचा आरोप आपने केला आहे. निवडणुकीच्या तारखा बदलणे आणि मतदारसंघाच्या आरक्षणात अचानक बदल करणे या बाबींवर आज आपच्या प्रतिनिधींनी राज्य निवडणूक आयुक्तांना थेट प्रश्न विचारले. या प्रतिनिधी मंडळात आपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि कार्याध्यक्ष वाल्मिकी नाईक, उपाध्यक्ष रॉक मास्कारेन्हास आणि राज्य संयुक्त सचिव नेरी फर्नांडिस यांचा समावेश होता.
वाल्मिकी नाईक म्हणाले, राज्य निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. जी राज्यपालांच्या आदेशाने त्यांना अहवाल देते, सरकारला नाही. पण आतापर्यंत या निवडणूक आयोगाने एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही, सर्वपक्षीय बैठक घेतली नाही, किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला एकही अधिकृत पत्र किंवा माहिती पाठवली नाही. याचा अर्थ असा आहे की, निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षाच्या सूचनांवर चालत आहे. नेरी फर्नांडिस म्हणाले, भाजप आणि इतर सत्तासोबती प्रवाहातील पक्षांमुळे स्थानिक राजकारणाच्या भानगडीत गोव्यातील झेडपी संस्था कमकुवत झाली आहे. पण आपचे सदस्य निवडून आल्यावर आम्ही जि. पं.ला पुन्हा सक्षम करून लोकांसाठी काम करणारी संस्था बनवू.