

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून विरोध असलेल्या मिराबाग येथील बंधाऱ्याचे काम पुढील ४ ते ५ महिने बंद ठेवण्यात येणार आहे. हा प्रकल्प होईल की नाही, याचा निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पक्षाशी चर्चा करून घेतला जाईल, असे मत जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर यांनी आज विधानसभेसाठी जाण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
अधिवेशनाच्या सात दिवसांच्या काळात विरोधी आमदारांनी या विषयावरून सरकारला घेरण्याचे प्रयत्नही केले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी पत्रकारांशी बोलताना मंत्री शिरोडकर म्हणाले की, दोन महिन्यांनंतर पावसाळा सुरू होणार आहे. मिराबाग येथील बंधाऱ्याचे काम पुढील चार ते पाच महिने बंद ठेवण्यात येईल. तेथील स्थानिकांनी सुरुवातीपासूनच मिराबाग येथील बंधारा प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पाविरोधात त्यांनी आंदोलन छेडले आहे.
निदर्शने आणि कारवाईचे आदेश
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांनी मडगाव येथील लोहिया मैदानावर जाऊन निदर्शने केली. त्याच दिवशी काही आंदोलकांनी विधानसभा सभागृहातील प्रेक्षक गॅलरीत येऊन प्रकल्पाविरोधात हातात फलक उंचावून नारेबाजी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या सभापती गणेश गावकर यांनी या आंदोलकांवर कारवाई करण्याचे आदेशही पोलिसांना दिले होते.