

पणजीः पुढारी वृत्तसेवा
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी शुक्रवारी सरकारला प्रश्न विचारला की, गोव्यातील नोकरी घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडी आणि आयकर विभागाला का सामील करून घेतले नाही. आलेमाव यांनी लक्षवेधी सूचनेदरम्यान, नोकरभरती घोटाळे आणि व्यापक भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला.
आलेमाव म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणावर नोकर भरतीतील अनियमिततेच्या प्रकरणांचे वारंवार अहवाल येत असल्याने, राज्यातील बेरोजगार तरुण आणि नोकरी शोधणाऱ्यांच्या मनात चिंतेचे वातावरण आहे. या प्रकरणांमध्ये, सरकारी विभागांमध्ये नोकरी देण्याच्या आश्वासनावर नोकरीच्या इच्छुकांची मोठ्या रकमेची फसवणूक केली जात असल्याचा आरोप आहे. खरं तर, ही व्यवस्थाच अयशस्वी झाली आहे.
या नोकरी घोटाळ्यात लाखो रुपयांचा समावेश आहे. पण सरकार या प्रकरणाचा योग्य तपास करण्यात अपयशी ठरले आहे. बेनामी खाती शोधली गेलीत का आणि पैसा कोणाच्या खिशात गेला आहे, हे सरकारने सांगावे. या नोकऱ्या कोणाला देऊ केल्या होत्या आणि कोणत्या विभागात याचाही सरकारने तपास करावा, असेही आलेमाव म्हणाले.