पुणे: स्वारगेट परिसरात मेट्रो बांधत असलेले पीएमपीचे प्रशस्त बसस्थानक आगामी सहा महिन्यांत पूर्ण होणार आहे. त्यानंतर पीएमपी प्रवाशांना येथून प्रशस्त बसस्थानकातून प्रवास करता येणार आहे. हे स्थानक पूर्ण झाल्याने येथून प्रवास करणार्या प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होणार आहे, असे पीएमपी अधिकार्यांनी सांगितले.
स्वारगेट भूमिगत स्थानक उभारण्यासाठी मेट्रो प्रशासनाने येथील पीएमपीचे बसस्थानक पाडले होते. ते आता मेट्रोकडून बांधून देण्यात येत आहे. याचे निम्म्यापर्यंत काम होत आले आहे. त्यामुळे आगामी काळात येथील बसस्थानक लवकरच पूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
सध्या येथे स्थानक आणि बस थांब्याची व्यवस्थित सुविधा नसल्यामुळे प्रवाशांना उन्हातच थांबावे लागत आहे. याबाबत पीएमपी अधिकार्यांना विचारणा केली असता, त्यांनी स्थानकाच्या कॉलम उभारणीचे काम सुरू असून, येत्या सहा महिन्यांत काम पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.
मेट्रो बांधत असलेल्या स्थानकाचे काम निम्म्यापर्यंत आले आहे. कॉलम उभारणीचे काम सुरू आहे. येत्या सहा महिन्यांत हे स्थानक पूर्ण होईल. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
- नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल