

Summary
सुरींदर कुमार खोसला यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी
आतापर्यंत एकूण ९ जणांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती
म्हापसा : पुढारी वृत्तसेवा हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन या क्लबमध्ये झालेल्या अग्नितांडवात २५ जणांच्या मृत्यूस जबाबदार धरून सध्या ९ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या क्लबचे मालक गौरव लुथरा, सौरभ लुथरा, अजय गुप्ता व सुरींदर कुमार खोसला या चौघांविरोधात लुक आऊट नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांच्या विरोधात लुथरा ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे.
संशयितांपैकी चौघा व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांना गोव्यात अटक करण्यात आली, तर पाचवा संशयित भरत सिंग कोहली याला दिल्लीत अटक करून गोव्यात आणले आहे, अशी माहिती पोलिस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर गोवा पोलिस अधीक्षक हरीश मडकईकर उपस्थित होते.
प्रमुख संशयितांपैकी क्लबचे मालक गौरव लुथरा व सौरभ लुथरा हे दोघेही सध्या थायलंडला पळून गेले असून त्यांना पकडून गोव्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. याकरिता इंटरपोल व इतर संबंधित अधिकारिणीशी संपर्क साधण्यात आला आहे.
अजय गुप्ता हा आणखी एक भागीदार असल्याचे मिळालेल्या कागदपत्रांवरून समजल्यामुळे तसेच या जागेचे मालक सुरिंदर कुमार खोसला या दोघांविरोधातही लुक आउट नोटीस बजावण्यात आली आहे. दिल्लीहून पकडण्यात आलेला भरतसिंग कोहली हा त्या क्लबचा ऑपरेशनल मॅनेजर म्हणून काम पाहत होता. दरम्यान, या प्रकरणातील अजय गुप्ता याला दिल्लीत अटक करण्यात आली.
या घटनेस जबाबदार धरून सरकारने निलंबित केलेल्या तत्कालीन पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव शर्मिला मोंतेरो व हडफडे पंचायतीचे सचिव रघुवीर बागकर यांना चौकशीसाठी पोलिस स्थानकात बोलावण्यात आले होते, त्यापैकी सिद्धी हळर्णकर व शर्मिला मोंतेरो यांनी पोलिस स्थानकात येऊन जबानी दिली आहे. तर रघुवीर बागकर अद्याप आले नाहीत. गरज पडली तर हडफडेच्या सरपंचांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. या घटनेची सध्या न्यायालयीन चौकशी सुरू असून या घटनेसंदर्भात आणखी कोणाची चौकशी करावयाची असल्यास त्यांनाही बोलावले जाईल, अशी माहिती डीआयजी वर्षा शर्मा यांनी दिली.
ब्लू कॉर्नर नोटीस आरोपींना शोधण्यास मदत करते आणि त्यांना त्यांच्या सध्याच्या ठिकाणाहून इतर कोणत्याही देशात स्थलांतरित होण्यापासून रोखते. ही नोटीस आरोपींविरुद्ध कारवाई होण्यापूर्वी जारी करण्यात येते. ती आंतरराष्ट्रीय विनंती, इंटरपोलच्या रंगीत नोटिसांचा एक भाग आहे जी देशांना जगभरात अलर्ट आणि माहितीसाठी विनंत्या सामायिक करण्यास सक्षम करते. फौजदारी आरोप दाखल करण्यापूर्वी ब्लू कॉर्नर नोटीस जारी केल्या जातात, तर रेड कॉर्नर नोटीस सामान्यतः फौजदारी गुन्ह्यात दोषी आढळल्यानंतर जारी केल्या जातात. देशात वा परदेशात असला तरी संबंधित व्यक्तीला थांबवले जाऊ शकते आणि अटक केली जाऊ शकते. ही नोटीस जारी करून त्याची बँक खाती गोठवता येऊ शकतात.