

पणजी : पुढारी वृत्तसेवा
दुचाकी चालक आणि मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठी हेल्मेट वापर सक्तीच्या निर्णयावर त्याच्या अंमलबजावणीसाठी चालकांना थोडा वेळ दिला जाईल. सरकारकडून लवचिक भूमिका घेतली जाणार असल्याचे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले आहे.
हा निर्णय केंद्र सरकारच्या निर्देशानुसार असून, त्यामागील मुख्य उद्देश रस्ते सुरक्षाच आहे. असे ते म्हणाले. मंत्री गुदिन्हो म्हणाले की, हेल्मेट नियमांची अंमलबजावणी करताना नागरिकांना तत्काळ दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार नाही.
लोकांना नियम पाळण्यासाठी आवश्यक ती मुदत दिली जाईल आणि सुरुवातीच्या काळात नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार नाही. टप्प्याटप्प्याने नियमाची कडक अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारचा हेतू दंड वसूल करणे नसून, नागरिकांच्या जीवाचे रक्षण करणे हा असल्याचेही त्यांनी सांगितले.