

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्ती वेतनात ३ हजार रुपये वाढ करुन स्वातंत्र्य सैनिकांचे मासिक निवृत्तीवेतन ९ हजारांवरून १२ हजार रुपये करण्यात आले आहे. त्याच सोबत दर महिन्याला मिळणाऱ्या भत्त्यातसुद्धा दोन हजार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे हा भत्ता ५ हजार रुपये होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी रात्री उशीरा ही माहिती दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्य सैनिक कल्याण समितीची बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
स्वातंत्र्य सैनिकांना दर महिन्याला निवृत्तीवेतनापोटी मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्याची स्वातंत्र्य सैनिकांची मागणी मान्य करण्यात आली. तसेच भत्ताही वाढवण्यात आला आहे.
सरकारतर्फे मानवंदना मिळेल
यापुढे स्वातंत्र्य सैनिकाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारापूर्वी त्यांना सरकारच्या वतीने मानवंदना दिली जाईल. अंत्यसंस्कारावेळी उपजिल्हाधिकारी आणि पोलिस उपअधीक्षक उपस्थित राहून सरकारच्या वतीने आदरांजली अर्पण करतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यांनी दिली.