

पणजी : पणजी-मेरशी ते जुने गोवे या कदंब पठारावरील दभाजकातील मोकळ्या जागेत हमरस्त्याच्या पिपळाची रोपे लावण्याची मोहीम सरकारने स्थगित केली आहे. पिंपळाची झाडे मोठी होत असल्याने ती रस्त्याच्या मधोमध लावल्यास भविष्यात रस्ते तसेच दुभाजकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याची भीती वृक्षतज्ज्ञांसह नागरिकांनी व्यक्त केली होती. यासंदर्भातील वृत्त दै. 'पुढारी'ने प्रसिद्ध केल्यानंतर सरकारने या मोहिमेला स्थगिती दिली आहे.
सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर यांनी कदंब पठारावरील महामार्गाच्या दुभाजकांवर वृक्षारोपण करण्याची मोहीम थांबवल्याचे सांगितले. दुभाजकांवर पिंपळाची झाडे लावणे योग्य आहे की नाही, याबाबतच्या चिंतांचा विचार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हमरस्त्याच्या मधील मोकळ्या जागेत पिंपळाची झाडे लावण्यास सुरुवात केल्यानंतर दै. वृक्षतज्ज्ञांचे मत जाणून घेत वृत्त प्रसिद्ध केले होते. पिंपळ हा महाकाय वृक्ष असून, अरुंद दुभाजकात तो वाढल्यास वाहतुकीसाठी निर्माण होणाऱ्या धोक्याविषयी या वृत्तातून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
रोपांमधील कमी अंतर, खड्यांची कमी खोली आणि अन्य बाबींमुळे केंद्र सरकारची ग्रीन कॉरिडॉर योजना टीकेचे लक्ष्य बनली होती. तज्ज्ञांच्या मते, हमरस्त्याच्या मध्यभागी मोठी न होणारी लहान झाडे लावली जावीत. येथे लावण्यात येणारी पिंपळाची झाडे १० ते १५ मीटरपर्यंत उंच वाढतात. त्यांचा घेर तसेच विस्तीर्ण पर्णसंभार यामुळे त्यांचा समावेश मोठ्या वृक्षांच्या प्रजातींमध्ये होतो.
पिंपळाची झाडे मोठी झाल्यानंतर दुभाजकांचे संरक्षण कठडे उखडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी खुज्या जातींची तसेच बोन्साय पद्धतीने वाढवता येतील अशी, मुळांची लांबी कमी असलेली रोपे लावावीत, अशी मागणी तज्ज्ञांनी केली आहे.
केंद्राच्या ग्रीन कॉरिडॉर योजनेअंतर्गत राज्यातील हमरस्ते व राज्य रस्त्यांच्या कडेला रोपे लावण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ही रोपे रस्त्याच्या मध्यभागी न लावता रस्त्यांच्या बाजूला लावावीत, अशी मागणीही तज्ज्ञांनी केली आहे.
ग्रीन गोवा ब्रिगेडचे (जीजीबी) संयोजक अॅव्हर्टिनो मिरांडा म्हणाले की, पिंपळाच्या मुळांमुळे आणि फांद्यांमुळे जीवित तसेच शारीरिक इजा होण्याचा धोका टाळण्यासाठी ही रोपे रस्त्याच्या बाजूच्या जागेत, रस्त्यापासून काहीशी दूर लावणे योग्य ठरेल.