

Goa Ganpati Vaje Tradition
पणजी : गोव्यात गणेश चतुर्थीचा उत्साह अपूर्व असा असतो. गणेश चतुर्थीत अनेक चालीरीती आहेत. त्यात ‘नवें’ असेल. यात आपल्या शेतात पिकलेले पहिले पीक गणपतीला अर्पण करण्याची प्रथा आहे. तसेच ‘हौसा’ असतो. हौसा हा ज्याप्रकारे सासरी नवदांपत्याने करण्याचा विधी आहे तसाच नवीन लग्न झालेल्या लेकीला माहेरहून प्रेमाची भेट देण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे ‘वजें’.
महाराष्ट्रात लग्नाच्या पहिल्या वर्षी जावयासाठी दिवाळसण साजरा केला जातो. थोडाफार असाच हा प्रकार आहे. लग्न झालेल्या मुलीचा संसार थाटून देण्याच्या उद्देशाने लग्नात जसा आहेर देतात, तसेच पहिल्या वर्षी गणपतीसाठी लागणारे जवळपास सर्व साहित्य लेकीच्या माहेरहून सासरी पाठवले जाते. त्यालाच वजें म्हणतात. यामध्ये टोपली भरून फळे, करंज्या, लाडू, मोदक तसेच इतर खाद्यपदार्थ दिले जातात. काही लोक लग्नानंतरची पहिली पाच वर्षे तर काहीजण प्रेमाने वर्षानुवर्षे ही भेट मुलीच्या सासरी पाठवत असतात. याशिवाय पूर्वी पोळपाट लाटणे, रंगीत पाट (ज्याला पोपटाचे पाट म्हणतात) दिले जात. त्यावर नक्षीदार पोपट रंगवलेले असत.
गोव्यात नार्वे येथे होणारी अष्टमीची जत्रा प्रसिद्ध आहे. या जत्रेत हे पाट विक्रीसाठी उपलब्ध असायचे. आज अष्टमीची फेरी म्हणून वेगळी स्वतंत्र जत्राच पणजीत मांडवीतीरी भरत असते; पण त्यात फर्निचर आणि कपडे, मोबाईल कव्हर अशा दुकानांची रेलचेल असते. अशा प्रकारचे पारंपरिक स्टॉल फार कमी लागतात. मात्र परंपरा म्हणून नार्वेची अष्टमीची फेरीच प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कटवडा मिळतो तशा गोव्यात वज्यात अर्ध्या करंज्या (गोव्यात त्याला नेवर्या म्हणतात) दिल्या जातात. पिठाच्या (हरभरा, वाटाणा, मूग भाजून भरडून त्यात गुळ मिसळून केलेल्या), सुकं खोबरं, गूळ, खसखस, पांढरे तीळ घालून केलेल्या करंज्या, रवा, खोबरं आणि साखर घालून केलेल्या अशा अनेक प्रकारच्या करंज्या दिल्या जातात. करंजीचा साचा तोच आतील सारण बदलत राहतं. हे पारंपरिक प्रकार आहेत. त्याशिवाय अनेक प्रकारचे सारण घालून अलीकडे करंज्या केल्या जातात. त्याशिवाय वजेंत पूजेचे सर्व साहित्यही दिले जाते.
गणपतीची पूजा झाल्यावर 'वजें'तील साहित्य शेजारच्या किमान पाच घरांत द्यावे अशी प्रथा होती. शेजारधर्म पाळणे, एकमेकांशी नाते दृढ करणे हा हेतूही यामागे आहे. त्यानिमित्ताने नवीन सुनेचा परिचय करून देणे, त्यांचे आशीर्वाद घेणे हाही उद्देश असतो. अंगावर टाकायचे उपरणे किंवा शेला खांद्यावर टाकून लग्नात जशी लग्नगाठ बांधतात तशा प्रकारे गाठ बांधून (त्याला गाठवण म्हणतात) सुपात घालून हे पदार्थ नवदांपत्याने शेजारच्या पाच घरांत देण्याची पद्धत आहे.
आज काळाच्या ओघात परंपरा बदलत आहेत. 'वजें'त वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. मात्र पूर्वावार ज्या ठरलेल्या वस्तू आहेत त्या त्यात असतातच. त्याशिवाय प्रत्येक जण आपली इच्छा, ऐपत, प्रतिष्ठा याला अनुसरून लेकीला (आणि पर्यायाने जावयालाही) भेटीच्या स्वरूपात हे वजें देत असतात.