

रत्नागिरी : लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या दोन दिवसांनी होणार आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे येथील कोकणवासीय रत्नागिरी जिल्ह्यात चारचाकी, एसटी, रेल्वे, खासगी बसेसद्वारे येऊ लागले आहेत. जिल्ह्यात रविवारी 1395 एसटीमधून कोकणकर दाखल झाले आहेत. कोकणवासीयांच्या गर्दीमुळे अवघे कोकण गर्दीने गजबजले आहे.
सरकारने गणेश उत्सवाला राज्यउत्सवाचा दर्जा दिल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव दणक्यात साजरा होणार आहे. त्यानिमित्त गणेशोत्सवात कोकणकरांचा प्रवास सुखकर, चांगला होण्यासाठी एसटी महामंडळाने तब्बल 5 हजार 200 एसटी बसेस सोडणार आहेत. 22 ऑगस्टपासून एसटी बसेस येण्यास सुरूवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 26 ऑगस्टपर्यंत 2930 एसटी बसेस येणार आहेत. दरम्यान, रविवारी तब्बल 1395 एसटी बसेस दाखल झाल्या आहेत. तर काहीजण स्वताची चारचाकी चालवत कुटूंबासोबत येत आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा दिसत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात खासगी बसेसही भरून येत आहेत. दरम्यान, 25 ऑगस्ट रोजी तब्बल 1200, तर 26 ऑगस्ट मंगळवारी 99 बसेस अशा एकूण 2930 एसटी बसेस रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होणार आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत 930 बसेस जादा यंदाच्या वर्षी येणार आहेत. एकंदरीत, कोकणवासी आपल्या गावात परतल्यामुळे जिल्हा गजबजलेला दिसत आहे. कोकणात आल्यानंतर एक वेगळाच आनंद कोकणवासींच्या चेहर्यावर दिसत आहे.
गणपती उत्सवामुळे कोकरणकरांसाठी एसटी महामंडळाने जादा बसेसची सोय केली आहे. तसेच 100 एसटी बसेस मार्गावर धावत आहेत. उत्सवासाठी येणार्यांची गैरसोय होवू नये म्हणून लांब पल्ला, ग्रामीण, शहरी वाहतुकीवर परिणम होवू नये म्हणून एसटी कर्मचार्यांंच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मतांच्या बेरजेसाठी आता कोकणकरांसाठी मोफत बस, रेल्वे बुकींग करून सुविधा दिली आहे. कार्यकर्त्यांनी गाड्यांचे आरक्षण केले आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर येथून गाड्या येत आहेत.