

Ganesh Chaturthi Dos and Don'ts in Marathi
सोलापूर : आबालवृद्धांच्या उत्साहाला उधाण आणणाऱ्या गणेश चतुर्थी उत्सवाला सुरुवात होत आहे. गणपती बाप्पाचे बुधवारी (दि.27) भाद्रपद शु. श्रीगणेश चतुर्थी दिवशी आगमन होत आहे. या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे 4:50 ते दुपारी 1:53 पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल, अशी माहिती 'पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.
घरामध्ये गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन करावे का?
घरामध्ये गर्भवती स्त्री असतानाही गणपती विसर्जन करावे. अशा वेळेस विसर्जन न करण्याची प्रथा चुकीची आहे. ही प्राणप्रतिष्ठा करून बसविलेली मूर्ती उत्तरपूजा करून देव्हार्यातून खाली काढतात व तिचे पाण्यात विसर्जन करतात.
गणेश मूर्तीचे विसर्जन वाहत्या पाण्यातच करावे का?
वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे नसून पाण्यात विसर्जन करावे असे आहे. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये, तसेच घरी मोठ्या बादलीमधील पाण्यात सुद्धा विसर्जन करता येते.
गणेशमूर्ती मातीची का असावी?
विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी. प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा तत्सम पाण्यात न विरघळणार्या पदार्थांची मूर्ती नसावी.
ज्येष्ठा गौरी कधी आणाव्यात?
रविवार 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:27 पर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात असतांना ज्येष्ठा गौरी आणाव्यात. सोमवार 1 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरींचे पूजन करावे आणि नैवेद्य दाखवावा. मंगळवार 2 सप्टेंबर रोजी रात्री 9:57 पर्यंत मूळ नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचे विसर्जन करावे.
गौरी कोण आहेत?
गौरी ही गणपतीची माता पार्वती होय. हिला महालक्ष्मी असेही म्हणतात.
एखाद्या वर्षी काही कारणाने भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशस्थापना करता न आल्यास पुढच्या वर्षी करता येते का?
हो. श्रीगणेश चतुर्थीच्या आधी एक दिवस किंवा त्याच दिवशी सकाळी मूर्ती आणावयास पाहिजे असे नाही. पार्थिव गणेश स्थापना करण्याचा भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा एकच दिवस असल्याने त्या दिवशी जमले नाही, तर पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येत नाही. एखाद्या वर्षी काही कारणाने लोप झाल्यास पुन्हा पुढील वर्षी गणपती पूजन करता येते.