

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा फॉरवर्ड पक्षाने गोव्यातील ४० पैकी १० जागा लढविण्याचे जवळजवळ निश्चित केले आहे. विजय सरदेसाई त्यानुसार १० मतदारसंघांत गट अध्यक्ष नेमले आहेत. गोवा फॉरवर्ड काँग्रेससोबत युतीची अपेक्षा करून असल्याने युतीनंतर किमान ८ जागा मिळाल्या तरी त्यावर समाधान मानून फॉरवर्ड व काँग्रेस युती होऊ शकते.
मात्र, आता अमित पाटकर यांच्या ऐवजी गिरीश चोडणकर हे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष झाले आहेत, तर दुसरीकडे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई आणि गिरीश चोडणकर यांच्यात पटत नसल्याने या दोन पक्षांत युती होईल का, याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे.
आमदार सरदेसाई यांनी यापूर्वीच गोवा फॉरवर्ड काँग्रेससोबत युती करून राज्यातील ज्या भागात जिल्हा पंचायत निवडणुकीत पक्षाला चांगली मते मिळाली आहेत; अशा दहा जागा लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी मांद्रे, पेडणे, कुंभारजुवे, मये, शिरोडा, मुरगाव, कुठ्ठाळी, फातोर्डा, सांगे व काणकोण या १० मतदारसंघांसाठी गट अध्यक्ष नियुक्त करून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
काँग्रेसने युतीसाठी पुढे यावे, बोलणी करावी व जागा निश्चित कराव्यात, अशी सूचना वारंवार करूनही काँग्रेसकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने फॉरवर्डने दहा जागी निवडणुकीचे काम सुरू केले आहे. काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून गिरीश चोडणकर यांची नियुक्ती पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने केल्यामुळे या पक्षात सध्या राजीनामासत्र सुरू आहे. अध्यक्ष राहिलेले अमित पाटकर, खासदार विरिएतो फर्नांडीस यांना न कळवता ही नियुक्ती झाल्याने वाद वाढले आहेत. चोडणकर व सरदेसाई यांचे वैर सर्वांनाच परिचीत आहे, त्यामुळे या दोन पक्षातील युतीबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
गोवा फॉरवर्डचे मतदारसंघनिहाय नवे गटाध्यक्ष
मांद्रे : राम नागवेकर, पेडणे प्रशांत घोडगे, कुंभारजुवे : कृष्णा परब, मये : समरेश वायगंणकर, शिरोडा विशांत गावकर, मुरगाव : नीलेश नावेलकर, कुठ्ठाळी : लुईस क्चाद्रुस, फातोर्डा पिटर फर्नांडिस, सांगे : संतोष गावकर, काणकोण: दत्ता ऊर्फ पांडुरंग गावकर.