

पणजी : पुढारी वृत्तसेवा
संघटित अमलीपदार्थ तस्करीविरोधात गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठे यश मिळविले. उत्तर प्रदेशातील बहराइच येथील इखलाक अहमद ऊर्फ मन्ना मलिक या मुख्य पुरवठादाराला अटक करून गुन्हे शाखेने आंतरराज्यीय अमली पदार्थ पुरवठा नेटवर्क यशस्वीरित्या उद्ध्वस्त केले.
गोव्यात अमलीपदार्थांच्या तस्करीमध्ये सामील असलेल्या तीन नेपाळी नागरिकांना यापूर्वी अटक झाली असून त्यांच्या अटकेनंतरच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेने मांडवी पुलाखालच्या बेती जेटीवर घाऊक मासे बाजाराजवळ २० मे रोजी छापा टाकून अमली पदार्थांच्या अवैध पुरवठ्यात सामील असलेल्या दोन नेपाळी नागरिकांना अटक केली होती.
या कारवाईदरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने अंदाजे ८.८८ लाख रु. किमतीचे ३९.८८ ग्रॅम हेरॉइन, एक स्कूटर आणि मोबाईल फोन जप्त केले होते. यावेळी अर्जुन विश्वकर्मा, (वय ३६, नेपाळी नागरिक), चेतकांत ओली (वय २५, नेपाळी नागरिक) व नरिशोर भंडारी या तिसऱ्या नेपाळी नागरिकालाही अटक केली.
संशयितांची सखोल चौकशी, डिजिटल पुराव्यांचे विश्लेषण आणि आर्थिक व्यवहारांच्या छाननीतून भारत-नेपाळ सीमा प्रदेशापासून गोव्यापर्यंत पसरलेली एक सुसंघटित अमली पदार्थांची पुरवठा साखळी उघडकीस आली.
दरम्यान, तपासात असे उघड झाले की, हे संशयित मोबाईल कम्युनिकेशनद्वारे उत्तर प्रदेशातील बहराइच येथील एका पुरवठादाराकडे हेरॉईनची ऑर्डर देत असत. या अमली पदार्थासाठीचे पैसे कथितरित्या ऑनलाइन बैंकिंग आणि डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मद्वारे दिले जात होते.
पेमेंटची पुष्टी झाल्यावर, पुरवठादार थेट गोवा रुपैदिहा बस सेवेद्वारे पार्सल पाठवून हा प्रतिबंधित माल पाठवत असे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश गाडेकर, पोलिस उपनिरीक्षक माधव नाईक, कल्पेश तोरस्कर आणि पोलिस कॉन्स्टेबल कृतेश किनळकर यांनी उत्तर प्रदेश एसटीएफच्या समन्वयाने पार पाडली. संपूर्ण तपास आणि आंतरराज्यीय कारवाई पोलिस अधीक्षक जीवबा दळवी यांच्या देखरेखीखाली आणि गोवा गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या देखरेखीखाली पार पडली.