

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा सरकार राज्यातील सहा अभयारण्यांच्या माध्यमातून जल, जंगल व जमीन यांच्यासह वन्यजीव आणि जैवविविधता यांचे संरक्षण करत आहे. राज्यातील जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. गरज पडल्यास त्यांच्या संरक्षणासाठी सरकार नवीन कायदे सरकार करील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
कांपाल पणजी येथे वन खात्याच्या जागेमध्ये शनिवारपासून आयोजित तीन दिवसांच्या वन वैविधता महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, आरोग्य व वनमंत्री विश्वजित राणे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष आमदार डॉक्टर देविया राणे आदी उपस्थित होते.
उदघाटक या नात्याने बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, पहिल्यांदाच बन विकास महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. देवीया राणे यांच्या संकल्पनेतून हा वन वैविधता महोत्सव गोव्यामध्ये होत आहे. हा महोत्सव आता दरवर्षी होईल. केवळ किनारी पर्यटनाकडे गोव्यात आलेले पर्यटक वळतात. त्यांना इंटरलॅण्ड टुरिझम व इको टुरिझमच्या माध्यमातून वनक्षेत्रात आणण्यासाठी अशा प्रकारचे महोत्सव उपयुक्त ठरतील, असे डॉ. सावंत म्हणाले.
गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसोबत स्थानिकांनी गोव्याच्या वनक्षेत्राचे सौंदर्य न्याहाळावे. येथील धबधब्यांचा अनुभव घ्यावा आणि निसर्ग पर्यटनाचा अनुभव घ्यावा. त्यासाठी सरकार विविध महोत्सवाचे आयोजन करत असल्याचे ते म्हणाले. वन खात्याने तयार केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून गोव्याच्या वनक्षेत्रातील सौंदर्य, धबधबे यांचे दर्शन घडते. हा व्हिडीओ जगभरामध्ये गेल्यानंतर गोव्यातील वनक्षेत्राचे सौंदर्य जगभर प्रसारित होईल, असे सांगून डॉ. देवीया राणे यांच्या पुढाकाराने वनक्षेत्रातील लोकांच्या खाद्य पदार्थाचे डॉक्युमेंटेशन झालेले आहे, या महोत्सवात त्यांचे स्टॉल आहेत, ही चांगली गोष्ट असल्याचे डॉ. सावंत म्हणाले.
चर्चासत्रांचे आयोजन इतर नेत्यांचीही समयोचित भाषणे झाली. सोमवार दिनांक १९ पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. या काळात संध्याकाळी पाचनंतर दररोज विविध कार्यक्रमांबरोबर जल, जमीन आणि जंगल संरक्षावरील चर्चासत्रे होणार आहेत.