

पणजी : हडफडे येथील बर्च नाईट क्लबला अबकारी परवानाप्रकरणातील वरिष्ठ लिपिक गौरश गावस याला म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. अर्जदाराचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा कोणताही पुरावा पोलिस सिद्ध करू शकले नाहीत, असे निरीक्षण केले आहे.
लुथरा ब्रदर्श यांच्या मालकीच्या बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबमध्ये मद्यविक्रीच्या अबकारी परवान्यासाठी कांदोळी येथील आरोग्य केंद्रातून मिळवण्यात आलेले प्रमाणपत्र बोगस असल्याचे सिद्ध झाल्याने म्हापसा पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात लुथरा ब्रदर्श व अजय गुप्ता तसेच अर्जदार वरिष्ठ लिपिक गौरशे गावस यांचे कटकारस्थान असल्यानेच
अबकारी प्रमाणपत्र दिले गेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची पोलिस कोठडीतील चौकशी आवश्यक नाही. त्याने तपासात सहकार्य केले आहे, असा दावाही म्हापसा पोलिसांनी केला होता. याच मुद्यावर न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला.
हे प्रकरण कथित बनावट आरोग्याचा ना हरकत दाखल्याच्या आधारे परवाना प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांशी संबंधित आहे. या प्रकरणाचा तपास म्हापसा पोलिसांकडून सुरू असून, संबंधित कागदपत्रे, परवाना मंजुरी प्रक्रिया आणि इतर संबंधित व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे. दरम्यान, न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करताना तपासात सहकार्य करण्याच्या अटी घातल्या आहेत.