

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
आगामी २०२७ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडचडे मतदारसंघातील भाजपमधील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांच्या तिकीटासंदर्भातील वक्तव्यावर जोरदार पलटवार करत, भाजपनेच नीलेश काब्राल यांना राजकारणात मोठे केले असून, पक्षाविरोधात अशी वक्तव्ये करणे त्यांनी तातडीने थांबवावे," असा स्पष्ट इशारा दिला. कुडचडेत भाजपचा विस्तार केवळ काब्राल यांच्या आगमनामुळे झालेला नाही, यापूर्वी रामराव देसाई कुडचडेतून दोनदा भाजप आमदार झालेले आहेत याची आठवणही दामू नाईक यांनी करून दिली.
काब्राल यांच्या विधानाचा सविस्तर अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठवल्याने या दिल्लीतील दामू नाईक वादाला आता राष्ट्रीय नेतृत्वाच्या पातळीवरही महत्त्व प्राप्त झाले आहे. काही दिवसांपूर्वी नीलेश काब्राल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी दिली तरी त्यावर विचार करावा लागेल, असे वक्तव्य केले होते. या विधानानंतर भाजपमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली असून, कुडचडे मतदारसंघातील उमेदवारीवरून मतभेद असल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
या पार्श्वभूमीवर दामू नाईक यांनी काब्राल यांच्यावर थेट निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, नीलेश काब्राल यांचे वक्तव्य पक्षशिस्तीला धरून नाही. भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य आणि पक्षाच्या तिकिटावर सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे सार्वजनिक विधान करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वक्तव्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले की, नीलेश काब्राल भाजपमध्ये येण्यापूर्वीही कुडचडे मतदारसंघात भाजपची ताकद होती. माजी आमदार रामराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली भाजपने या मतदारसंघात दोन वेळा विजय मिळवला होता. त्यामुळे कुडचडेत भाजपचा विस्तार केवळ काब्राल यांच्या आगमनामुळे झाला, असा दावा चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. काब्राल यांच्या वक्तव्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे दिल्लीला पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात योग्य तो निर्णय पक्षाचे केंद्रीय नेतृत्व घेईल. पक्षविरोधी किंवा संभ्रम निर्माण करणारी सार्वजनिक वक्तव्ये भाजपमध्ये सहन केली जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.