

पणजी : गोवा सरकारने सरकारी नोकरीसाठी किमान एक वर्षाचा अनुभव सक्तीचा केला आहे. त्यामुळे युवांनी एक वर्ष खासगी क्षेत्रात अनुभवासाठी नोकरी करावी व त्यानंतर सरकारी नोकरीसाठी अर्ज करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. कर्मचारी निवड आयोगामार्फत २,५०० पदे भरणार असल्याचेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
बांबोळी येथे गुरुवारी गोवा मानव संसाधन विकास महामंडळातर्फे आयोजित 'जॉब फेअर' तथा रोजगार मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड, गोवा मानव संसाधन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार रुडाल्फ फर्नांडिस, उपाध्यक्ष दीपक नाईक, खादी व ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष आमदार आंतोनियो वास, मुख्य सचिव डॉ. व्ही कांडावेलू आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, आतापर्यंत सुरक्षारक्षक व हाऊसकीपिंगमध्ये ५ हजार जणांना नोकरी प्राप्त झाली आहे. सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षितांना २ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सरकारी नोकऱ्यांमध्ये सामावून घेण्याचे धोरण स्वीकारले आहे. आतापर्यंत ४० सुरक्षारक्षक पोलिस खात्यात भरती झाल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
या रोजगार मेळाव्याला मोठ्या संख्येने युवांनी उपस्थिती लावली. उद्योग संघटनेसोबत चर्चा खासगी उद्योगांमध्ये एक वर्ष नोकरी केलेल्यांना सरकारी नोकरीची संधी मिळणार असून खासगी उद्योगातील नोकऱ्या सुरक्षित राहाव्यात, यासाठी उद्योग संघटनेसोबत सरकारने चर्चा केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
निवड आयोग, 'करिअर जागोर 'द्वारे मार्ग
कर्मचारी निवड आयोगासारख्या पारदर्शक प्रणाली आणि करिअर जागोरसारख्या मार्गदर्शन कार्यक्रमांद्वारे प्रत्येकाला यशाचा योग्य मार्ग मिळावा, यासाठी प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
स्पर्धा परीक्षेची तयारी करा
सरकारने 'करिअर जागोर' कार्यक्रम सुरू करून शिक्षकांना मार्गदर्शक म्हणून नेमले आहे. युवकांनी गोवा लोकसेवा आयोग यूपीएससी आदी स्पर्धा परीक्षांना बसण्याची तयारी ठेवावी.