

पणजी : ओंकार हत्तीला पकडून गुजरातमधील वनतारामध्ये पाठवायचे आहे, त्यादृष्टीने कर्नाटकचे प्रधान मुख्य वनसंरक्षक कमल दत्ता यांच्याशी बोलणी सुरू आहे, अशी माहिती वनमंत्री विश्वजित राणे यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. राणे यांनी सांगितले की, सध्या तो महाराष्ट्रात गेला आहे. कधी महाराष्ट्र, कधी गोवा असा त्याचा प्रवास सुरू असतो. त्यामुळे गोव्याच्या हद्दीत आल्यावर त्याला बेशुद्ध करून पकडले जाईल. ही प्रक्रिया सोपी नाही, त्यात वेळ जाऊ शकतो. मात्र, आमदार प्रवीण आर्लेकर ओंकारच्या बंदोबस्ताबाबत आग्रही असल्याने कर्नाटक वन विभागाशी बोलणी सुरू केली आहे.
मंत्री राणे म्हणाले की, कर्नाटक वन विभागाने हत्तीला पकडण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यांच्याकडे हत्तींची संख्या खूप असल्याने ते ओंकारला सांभाळू शकत नाहीत. त्यामुळे ऑकारला वनतारात पाठविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही राणे म्हणाले.
ओंकार कुंब्रल - बोर्डेकरवाडीत
गोव्यातून दोडामार्गकडे गेलेला ओंकार कळणे, उगाडे, भिकेकोनाळमार्गे कुंब्रलला गेला आहे. बुधवारी दुपारी १२.५८ वाजता तो कुंब्रल शाळा क्रमांक १ जवळ होता.