

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
एका कोकणी नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शणै गोंयबाब यांच्यावरील लेखावरून निर्माण झालेल्या वादानंतर लेखक तथा उद्योजक दत्ता नायक यांनी कोकणी भाषा मंडळाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
तसेच मंडळाला जाहीर केलेल्या १ कोटी रुपयांच्या देणगीतील उर्वरित रक्कमही मागे घेतल्याची घोषणा केली आहे. कोकणी भाषा मंडळ आणि अखिल भारतीय कोकणी परिषद यांनी एका नियतकालिकातील दत्ता नायक यांच्या लेखावर आक्षेप घेत संयुक्त प्रसिद्धीपत्रक जारी केले होते.
लेखातील काही मजकुराबाबत हरकत नोंदवित दोन्ही संस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दत्ता नायक यांनी सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. दत्ता नायक यांनी कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष सेराफिन कॉता यांना ई-मेलद्वारे राजीनामा पाठविला आहे. राजीनामा पत्रात त्यांनी दोन्ही संस्थांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केलेल्या निवेदनाबद्दल नाराजी व्यक्त केली.