

हणजूण : पुढारी वृत्तसेवा
हणजूण पोलिसांनी सायबर हॉक कृती अंतर्गत २.९३ लाखांच्या सायबर फसवणुकीप्रकरणी पोराग देब्बार्मा (वय २१) या त्रिपुराच्या संशयित युवकास त्रिपुरा येथून ताब्यात घेऊन गोव्यात आणले. मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताने येथील एका स्थानिकास यूपीआय ट्रांजेक्शनच्या माध्यमातून सायबर फ्रॉड करून सुमारे २.९३ लाख रुपये स्वतःच्या बँक अकाऊंटमध्ये वळवून एटीएमद्वारे काढून घेतले.
आपली फसवणूक झाल्याचे कळाल्यानंतर स्थानिकाने हणजूण पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर निरीक्षक कृष्णा सिनारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साईश शेटगावकर यांनी कैलास मांद्रेकर, संतोष आणि स्वप्निल या पोलिस सहकाऱ्यांच्या सहकार्याने सायबर हॉक कृती अंतर्गत तपासकाम करून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित पोराग याला त्रिपुरा येथून त्रिपुरा पोलिसांच्या सहकार्याने अटक करून गोव्यात आणले.