

पणजी : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी गिरीश चोडणकर यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्ष संघटनेच्या पुनर्बाधणीला वेग आला आहे. नव्या अध्यक्षांसोबत शनिवार, दि. ६ रोजी झालेल्या बैठकीत येत्या १५ दिवसांत प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी दिली.
बैठकीला पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष आणि विविध आघाडी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, पक्ष संघटनेची स्थिती, आगामी निवडणुकांची तयारी आणि तळागाळातील कार्यकत्यांना सक्रिय करण्याच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
ठाकरे म्हणाले, नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पक्षाला अधिक सक्षम आणि लोकाभिमुख बनविण्यासाठी संघटनात्मक पातळीवर व्यापक बदल करण्यात येणार आहेत. प्रदेश कार्यकारिणीसोबतच जिल्हा, ब्लॉक, युवक, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याक विभागांच्या समित्यांचेही पुनर्गठन केले जाणार आहे.
या प्रक्रियेत पक्षातील अनुभवी नेत्यांसोबतच नव्या आणि तरुण कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला जाईल. आगामी काळात काँग्रेस संघटना अधिक मजबूत करून राज्यात पक्षाला पर्याय म्हणून उभे करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. ठाकरे म्हणाले, काँग्रेस पक्षात कोणत्याही प्रकारची फूट नाही.
पक्षात फूट पडल्याच्या वावड्या विरोधकांकडून पसरवल्या जात आहेत. आगामी विधानसभेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे, हे काँग्रेसचे उद्दिष्ट्य आहे. त्यासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकसंधपणे सक्रिय कार्यरत आहेत. पक्षाच्या संघटित कामामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसलाच यश मिळेल. पक्ष संघटना तळागाळात पुन्हा सक्षम करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
बेरोजगारी, महागाईविरोधात काँग्रेस मैदानात
काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये संघटनात्मक बांधणीवर भर दिला जाणार असून, जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याचे धोरण पक्षाने स्वीकारले आहे. बेरोजगारी, महागाई, पायाभूत सुविधा, खाण उद्योग, पर्यटन आणि शेतकरी प्रश्नांवर काँग्रेस जनतेशी थेट संवाद साधणार असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले. नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्तीनंतर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, अनेक ठिकाणी बैठका आणि चर्चा सुरू झाल्या आहेत.
काँग्रेस राज्यात क्रांती दिन साजरा करणार
काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे म्हणाले, गोवा काँग्रेस १८ जून रोजी राज्यभरात भव्य कार्यक्रमांचे आयोजन करून क्रांती दिन साजरा करेल. पक्ष गोव्याच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असून, येथील लोकांच्या कल्याणासाठी, प्रगतीसाठी आणि विकासासाठी काम करत राहील.