

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा विधानसभेची निवडणूक पुढील आठ ते दहा महिन्यांत होणार आहे. दुसरीकडे सध्याचे देशातील भारतीय जनता पक्षाला पूरक असलेले वातावरण पाहून राज्यात मुदतपूर्व निवडणूक घेतली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकत जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. त्या तुलनेत विरोधी पक्ष अद्यापही शांतच आहेत.
भाजपने प्रत्येक मतदारसंघामध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा घेतानाच महिला आणि विविध विभागांच्या प्रतिनिधींची संमेलने घेऊन कार्यकार्त्यांना सक्रीय करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी २०२७ मध्ये भाजप ३० जागा जिंकेल असा निर्धार जाहीर केलेला आहे.
एका बाजूला भाजप सक्रियपणे निवडणुकीची तयारी करत असताना राज्यातील विरोधात असलेल्या पक्षाकडून मात्र निवडणुकीबाबात अद्याप कोणतीही हालचाल दिसत नाही. त्यामुळे राजकीय विश्लेषकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्यात सत्ताधारी भाजपकडे स्वतःचे २८ आमदार असून मगो पक्षाचे दोन व तीन अपक्षांसह एकूण 33 आमदारांचे पाठबळ आहे. विरोधात केवळ सात आमदार आहेत.
विरोधी पक्ष असलेल्या कौग्रेसचे तीन, आम आदमी पक्षाचे दोन, आरजीचा एक वगोवा पौरवईचा एक अशी ही संख्या आहे. यातील गोवा फॉरवर्डने मांद्रेत कार्यालय स्थापन केले असून काँग्रेसकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने दहा मतदारसंघ हेरुन या पक्षाने नियोजन केले आहे.
मात्र, अद्याप प्रचाराची हालचाल दिसून येत नाही. काँग्रेसकडूनही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही हालचाल दिसून येत नाही. दर निवडणुकीत ऐनवेळी उमेदवार जाहीर करण्याचे काँग्रेसचे तंत्र यावेळीही कायम राहिल, असा अंदाज राजकीय निरीक्षक वर्तवित आहेत.
केवळ पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्ष आपली भूमिका मांडत राहिले तर त्यातून मते मिळणार नाहीत. त्यासाठी प्रत्यक्ष लोकांमध्ये जाण्याची गरज आहे. विरोधी पक्षांनी सध्यातरी कोणत्याच तातळीवर सुरू केलेले नाही. त्यामुळे सध्या देशांमधील वातावरण पाहता आणि विरोधी पक्षांची हतबलता पाहता २०२७ ची निवडणुकी भाजपला पुन्हा सत्ता देण्याची शक्यता दिसत आहे.
भाजपला अनुकूल वातावरण....
विरोधी पक्ष सुस्तावलेले पाहून व भाजपला अनुकूल वातावरण पाहून भाजपचे सरकार मुदतपूर्व निवडणुका घेईल की काय अशी चर्चा काही लोक करत आहेत. मात्र त्याबाबत कुणीच विधान केलेले नाही किंवा दुजोराही दिलेला नाही.
आपचे लक्ष अल्पसंख्याकांवरच...
स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केलेल्या आम आदमी पक्षाचा भरोसा हा दक्षिण गोव्यातील अल्पसंख्याक मतदारांवर असल्याचे दिसून येते. त्यामुळे या पक्षाचे दोन आमदार आपापल्या मतदारसंघावरच लक्ष केंद्रित करुन काम करत आहेत. राज्याच्या इतर भागात आपची कुठेच हालचाल दिसत नाही.
आरजीमध्ये अंतर्गत कलह......
मोठा गाजावाजा करीत २०२२ ची निवडणूक लढवलेल्या आणि पहिल्याच प्रयत्नात एक जागा जिंकलेला रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) या पक्षाकडून लोकांना अपेक्षा होत्या, मात्र या पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. पक्षाचे अध्यक्ष मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांच्यातील वाद जगजाहीर झाला आहे. त्यामुळे या पक्षाचे संघटनात्मक कार्य थंडावले आहे.