

Goa Comunidades Must Correct Mistakes, Says Revenue Minister Babush Monserrate
पणजी : राज्यातील काही कोमुनिदार्दीकडून माझे घर योजनेंतर्गत घरे नियमित करण्यासाठी बाबूश मोन्सेरात आवश्यक असलेला अधिकृत परवाना देण्यास आडमुठेपणा तसेच विलंब केला करत तो चुकीचा आहे. त्यांनी पूर्वी या घरांना बांधकाम करण्यास परवानगी देऊन केलेल्या चुका मान्य करून त्या या योजनेंतर्गत सुधारण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत महसूलमंत्री आंतानासिओ ऊर्फ बाबूश मोन्सेरात यांनी बुधवारी व्यक्त केले.
पणजीतील श्री महालक्ष्मी देवालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याने मंत्री मोन्सेरात यांनी केलेल्या एका कार्यक्रमानंतर त्यांनी संवाद साधला. गोव्याबाहेरून कोणी आला व कोमुनिदाद जागेत लगेच घर बांधले असे गोव्यात घडलेले नाही. जर एखाद्याने कोमुनिदाद जागेत घर बांधले तर तेव्हा त्याला बांधकाम करण्यास कशी परवानगी दिली. तेव्हाच हे बांधकाम का रोखण्यात आले नाही किंवा कारवाई केली गेली नाही, असा प्रश्न त्यांनी केला.
तेव्हा कोमुनिदादच्या पदाधिकाऱ्यांनी ही परवानी दिली असावी व आता घर मालकाला ते त्याच्या स्वतःच्या नावावर करून मिळत नव्हते, ती कोणाची जबाबदारी व चूक होती, असे मंत्री मोन्सेरात म्हणाले.
कोमुनिदाद जमिनीत घरे बांधलेल्या काही व्यक्तींकडे जमीन घेतलेल्याची पोचपावती आहे. त्यामुळे ही चूक कोमुनिदादचीच आहे. या जागा त्यांच्या असल्याने त्याचे संरक्षण करण्याचे काम त्यांचेच होते. त्यामुळे यापूर्वी ज्या काही चुका झाल्या त्या सुधारून यापुढे अशा बांधकामांना परवाने कोमुनिदादने योग्य प्रक्रियेशिवाय देऊ नयेत, असे मत त्यांनी मांडले.
पुन्हा भाजपच सत्तेवर येईल
लोकशाहीत मतदारांच्या मतांना अधिक महत्त्व असते. त्यांचा लोकप्रतिनिधी कोण असावा याचा त्यांना स्वतंत्र अधिकार आहे. जर कोणी चांगले काम केलेले असेल तर मतदार त्या लोकप्रतिनिधीला पन्हा निवडून देतील; अन्यथा त्याला घरी पाठवतील. भाजप सरकारच्या कारकिर्दीत झालेली विकासकामे पाहता २०२७ गोवा विधानसभा व २०२९ लोकसभा निवडणुकीत लोक पुन्हा भाजपला सत्तेवर आणतील, असा विश्वास मंत्री मोन्सेरात यांनी व्यक्त केला.
फुटबॉल मैदानाबाबत राणेंशी चर्चा
कांपाल येथील फुटबॉल मैदानाबाबत त्रांगडे आहे, त्यामुळे त्याचा वापर करण्यास विलंब होत आहे. मैदानाचे काम जी सुडाने केले तर जमीन नगर नियोजन खात्याची आहे. जी सुडाने अजून हे मैदान पणजी महापालिकेकडे हस्तांतरित केलेले नाही. त्यामुळे या मैदानाच्या वापराबाबत टीसीपी मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे मंत्री मोन्सेरात म्हणाले.