

साखळी : पुढारी वृत्तसेवा
शाळांमध्ये व्हिजन चार्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची दृष्टी तपासून संभाव्य नेत्रविकार वेळीच ओळखण्याची जबाबदारी आता शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. राज्यातील १,७१७ हायस्कूलमधील शिक्षकांना यासाठी प्रशिक्षण देण्यात येत असून, प्रशिक्षणानंतर येत्या १५ दिवसांत विद्यार्थ्यांची तपासणी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी सरकार गंभीर असून, त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
गोवा सरकारच्या 'व्हिजन फॉर ऑल' या शालेय विद्यार्थ्यांच्या नेत्रतपासणी व उपचार उपक्रमांतर्गत शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक भगिरथ शेट्ये, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर, नगराध्यक्षा अंजना कामत, डॉ. कृष्णप्रसाद कुडुलू, डॉ. धर्मप्रसाद राय आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, दोनवेळा राबविलेल्या 'व्हिजन फॉर ऑल' उपक्रमातून ३३ हजार विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वितरित करण्यात आले. प्राथमिक तपासणी झाली नसती, तर या विद्यार्थ्यांना आपल्या डोळ्यांचा ५ क्रमांक असल्याचेही समजले नसते. वेळीच उपचार न झाल्यास भविष्यात हा क्रमांक वाढून दृष्टीच्या समस्या गंभीर होऊ शकल्या असत्या. या उपक्रमातून डोळ्यांच्या सौम्य तक्रारी असलेले ३३ हजार विद्यार्थी आढळले. त्यापैकी १० विद्यार्थ्यांवर नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आल्या. पालकांना विश्वासात घेऊन केलेल्या या शस्त्रक्रियांमुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील संभाव्य नेत्रविकारांपासून वाचविणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षकांनी व्हिजन चार्टच्या साहाय्याने प्रत्येक विद्यार्थ्याची काळजीपूर्वक तपासणी करावी. संशयास्पद लक्षणे आढळणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील तपासणी व उपचारांसाठी रुग्णालयात पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले. उडपी येथील प्रासाद नेत्रालय सुपर स्पेशालिटी नेत्र इस्पितळ आणि गोवा सीएसआर प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
मुलांना सकाळच्या उन्हात खेळायला प्रोत्साहन द्या
शिक्षकांनी ही जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी. एका विद्यार्थ्याची तपासणी राहून गेल्याने भविष्यात त्याला नेत्रविकाराचा त्रास झाल्यास त्याची खंत राहील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग, प्राणायाम आणि सकाळच्या उन्हात खेळण्यालाही प्रोत्साहन द्यावे, असे त्यांनी सांगितले. या तपासणीनंतर डिसेंबर ते जानेवारीदरम्यान विद्यार्थ्यांना आवश्यक उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत.