

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे शनिवारी तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. या दिल्ली भेटीत मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आणि विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. माजी मंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे एक मंत्रीपद रिक्त आहे.
त्या जागी नव्या मंत्र्याला सहभागी करून घेण्याबाबत त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या एकूण तयारीबाबत आणि महत्त्वाचे म्हणजे उमेदवारीबाबत या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर आली असल्यने व युती असल्याने राज्यात किती जागा लढवायच्या, संभाव्य उमेदवार यावर भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबत मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष चर्चा करणार आहेत.
काही विद्यमान आमदारांना उमेदवारी डावलली जाऊ शकते. त्यांच्या जागी पर्यायी उमेदवार कोण याबाबतही या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. सरकारने विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये घेण्याचे ठरवले, तर अवघे चार महिने मिळणार आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे तातडीने दिल्लीला गेल्याचे कळते.