

पणजी : पुढारी वृत्तसेवा
कळंगुट येथे क्राईम ब्रँचने मोठी कारवाई करीत ११५.८६१ ग्रॅम मेथैम्फेटामाइनचा साठा जप्त केला असून दिल्लीस्थित व सध्या कळंगुट येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या नितीन लुंबा (वय ४४) याला अटक केली. या अमलीपदार्थाची किंमत सुमारे ११,५८,६१० रुपये आहे.
ही कारवाई काल मध्यरात्री करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलिस खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँचने संशयितावर गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवली होती. मध्यरात्री तो फ्लॅटमध्ये असल्याची माहिती मिळताच तेथे छापा टाकण्यात आला. त्याच्या फ्लॅटची झडती घेतली असता व्यावसायिक प्रमाणात अमलीपदार्थ सापडला.
त्याने हा अमलीपदार्थ कोठून आणला व त्यामध्ये ड्रग्ज नेटवर्क गुंतलेले आहे का, याचा शोध पोलिस घेत आहे. न्यायालयाने संशयिताची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. एनडीपीएस कायद्याच्या कलम २२ (सी) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कळंगुट येथील कारवाई करणारे पथक
तपास क्राईम ब्रँच अधीक्षक राहुल गुप्ता (आयपीएस) यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. क्राईम ब्रँचच्या पथकाने घातलेल्या छाप्यातील पथकामध्ये अमीन ए. नाईक, अर्जुन सांगोडकर, संतोश गोवेकर, इर्शाद वाटांगी, उदेश केरकर, सुशांत पागी, महाबळेश्वर सावंत आणि विराज खांडेपारकर यांचा समावेश होता.