

पणजी : पुढारी वृत्तसेवा
आठ वर्षांपूर्वी म्हापसा येथील मासळी मार्केटमध्ये टायरोन नाझारेथ खूनप्रकरणातील तिघे आरोपी जोझेफ ब्रँडन सिक्वेरा, सिऑन ब्रुनो फर्नांडिस व महेश रामपाल या तिघांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्दबातल ठरवून त्यांना पुराव्याअभावी निर्दोषमुक्त केले.
या खूनप्रकरणी तपासकामावेळी तपास अधिकाऱ्यांनी आरोपींची ओळख परेड घेण्यास विलंब केला त्याचे कारण स्पष्ट केलेले नाही. ही ओळख परेड घेताना डमी व्यक्तीची रचना मार्गदर्शक सूचनांप्रमाणे झाली की नाही याचा पुरावा नाही. अशा त्रुटीमुळे ओळखपरेडची विश्वासार्हता कमी होते.
सादर करण्यात आलेल्या पुराव्यामध्ये विसंगती, ओळखपरेड यामध्ये त्रुटी, प्रत्यक्षदर्शी साक्षेच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने ही शिक्षा रद्द करण्यात आल्याचे निरीक्षण गोवा खंडपीठाने निवाड्यात केले आहे तसेच सरकारी वकील आरोपींचा ठोस सहभाग, विश्वासार्ह आणि वाजवी शंका न उरता सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे असे म्हटले आहे. जोझेफ बॅण्डन सिक्वेरा, सिऑन ब्रुनो फर्नांडिस आणि महेश रामपाल या तिघांना टायरोन नाझारेथ याच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ३० मे २०२३ रोजी दिली होती त्या शिक्षेला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
२४ जून २०१७ च्या रात्री टायरोन नाझरेथ हा दिपेश नाईक आणि जॉर्ज नोरोन्हा या मित्रांसह कळंगुट मासळी मार्केटमध्ये बसला होता. रात्री ११.३० च्या सुमारास तिघांपैकी दोघे बीअर घेण्यासाठी विकी बारकडे गेले असताना आरोपी दुचाकीवरून येऊन नाझरेथचा ठावठिकाणा विचारत होते. तक्रारदाराने माहिती नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपी मासळी मार्केटमध्ये गेले. त्यांना नाझारेथ दिसल्यावर त्याच्यावर चॉपर, चाकू आणि तलवारीसारख्या शस्त्रांनी हल्ला करून पळून गेले. गंभीर जखमी नाझरेथचा नंतर मृत्यू झाला होता.