

पणजी : पुढारी वृत्तसेवा
काजू महोत्सवाच्या यंदाच्या चौथ्या आवृत्तीत समृद्ध, अनुभवप्रधान आणि गोमंतकीयांच्या दृष्टीने अधिक कुटुंबाभिमुख कार्यक्रमांची मेजवानी पाहायला मिळणार आहे. मागील तीन वर्षांत या महोत्सवाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांनी यंदा अधिक नियोजनबद्ध आणि आकर्षक उपक्रमांची भर घातली आहे, असे आमदार डॉ. देविया राणे यांनी सांगितले.
यंदाच्या महोत्सवात पारंपरिक काजू प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवता यावी यासाठी भट्टी ची उभारणी, काजू सोलण्याची प्रक्रिया, ड्रम रोस्टिंग यांसारख्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष आकर्षण म्हणून काजू सफरचंद स्टॉम्पिंग सारखा मजेशीर उपक्रमही ठेवण्यात आला आहे.
तसेच मुलांसाठी पारंपरिक खेळ, डिजिटल उपक्रम, कुटुंबांसाठी फोटो बूथ आणि विविध उपक्रमांची उभारणी करण्यात आली आहे. यावर्षीच्या महोत्सवाची व्याप्ती मुख्य कार्यक्रमापुरती मर्यादित न ठेवता काजू ट्रेल, रेस्टॉरंट आणि बार टेकओव्हर्स यांसारख्या उपक्रमांद्वारे तो शहरातील विविध ठिकाणी विस्तारण्यात आला आहे. या उपक्रमांमुळे नव्या प्रेक्षकवर्गाशी संपर्क साधण्यास मदत होत असल्याचेही आयोजकांनी सांगितले. दरवर्षी सुमारे २० ते २५ हजार पर्यटक या महोत्सवाला भेट देतात.
स्थानिक शेतकरी, उद्योजक, स्वयंसेवी गट आणि तरुणांचा सक्रिय सहभाग हा या महोत्सवाचे मोठे बलस्थान ठरत आहे. राज्याच्या सांस्कृतिक वारशाशी निगडित असलेला हा महोत्सव स्थानिकांमध्ये अभिमान आणि स्वकर्तृत्वाची भावना निर्माण करत आहे.
सरकारचा दीर्घकालीन दृष्टिकोन हा केवळ काजू उत्पादनांचे बाहेर विपणन करण्यापुरता मर्यादित नसून, पर्यटकांना गोव्यात आकर्षित करण्यावर केंद्रित आहे, काजूपासून बनणाऱ्या हुराक आणि फेणीसारख्या पारंपरिक पेयांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. गोव्याचा काजू महोत्सव हा केवळ सांस्कृतिक सोहळा न राहता पर्यटन, अर्थव्यवस्था आणि स्थानिक परंपरेचा संगम ठरत असून, यंदाची आवृत्ती अधिक व्यापक आणि परिणामकारक ठरण्याची अपेक्षा आहे.
महोत्सवामुळे रोजगारनिर्मितीला चालना
रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरत असून शेतकरी, कारागीर, महिला बचत गट, तसेच लघुउद्योजकांना थेट आणि अप्रत्यक्ष संधी उपलब्ध करून देतो. काजू आणि त्याच्या पपदार्थाना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नेटवर्किंग आणि ब्रेडिंगला चालना दिली जात आहे.
विशेष सत्रांचे आयोजन
पर्यावरणीय आणि शाश्वततेच्या दृष्टीनेही महोत्सवात विशेष सत्रांचे आयोजन करण्यात येते. तज्ज्ञांच्या चर्चामधून काजू लागवडीतील अडचणी, पर्यावरणीय आव्हाने आणि शाश्वत शेती पद्धतींवर मार्गदर्शन केले जाते. तसेच, पर्यावरणपूरक साहित्याचा वापर आणि जबाबदार आयोजनावर भर दिला जात आहे.