

खोतीगाव : पुढारी वृत्तसेवा
गोवा सरकार स्थानिक कारागीर, हस्त व्यावसायिक आणि पारंपरिक उद्योगांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन कला, संस्कृती मंत्री रमेश तवडकर यांनी केले.
काणकोण तालुक्यातील इदर लोलये येथे असलेल्या शासकीय सुतारकाम-सह-सामायिक सुविधा केंद्राच्या नूतनीकरण व नव्या बांधकाम कामांचा भूमिपूजन सोहळा कला व संस्कृती खात्याचे मंत्री तथा आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश तवडकर यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
लोलयेच्या सरपंच निशा च्यारी, उपसरपंच आशुतोष बांदेकर, पंचायतीचे सदस्य सुप्रिया पागी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकल्पांतर्गत साठवणूक कक्ष, शेड, प्रवेश रस्ता तसेच कंपाऊंड भिंत उभारण्यात येणार असून यासाठी सुमारे ७५ लाख रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. या नूतनीकरणामुळे केंद्राची भौतिक सुविधा अधिक सक्षम होऊन स्थानिक कारागीर, सुतार तसेच हस्तकला व्यावसायिकांना मोठा लाभहोणार आहे.
सरकार केवळ योजना जाहीर करून धांवत नाही, तर त्या प्रत्यक्षात उतरवून स्थानिकांना आर्थिक पाठबळ देण्याचे कार्य करत असल्याचे सांगत मंत्री तवडकर यांनी या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी कार्यक्रमात पैंगीण जिल्हा पंचायत सदस्य अजय लोलयेकर, सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करत केंद्राच्या नूतनीकरणामुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रम उत्साही वातावरणात झाला.
वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्नशील
हैंडलूम, कुंभी साडी व शाल यांसारख्या पारंपरिक कलांच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या हाताला काम मिळावे, त्यांना योग्य वाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य मूल्य मिळावे, यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे मंत्री तवडकर यांनी स्पष्ट केले.
रोजगार निर्मितीस मिळेल चालना तवडकर
या सुतारकाम-सह-सामायिक सुविधा केंद्राच्या नूतनीकरणामुळे स्थानिक सुतार, लघुउद्योगिक, स्वयंरोजगार करणारे युवक व महिलांना एकत्रितपणे काम करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असून त्यामुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असेही मंत्री तवडकर यांनी नमूद केले.