

पणजी : गोमंतकीय फुटबॉलला नव्या उंचीवर नेण्यासाठी गोवा फुटबॉल डेव्हलपमेंट कौन्सिल (जीएफडीसी) कटिबद्ध असून, या दिशेने सर्व प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही जीएफडीसीचे अध्यक्ष ग्लेन टिकलो यांनी दिली.
शिवोली येथील चर्च मैदानावर शनिवारी जीएफडीसी शिवोलीच्या वतीने आयोजित फुटबॉल किट्स वितरण व भारताच्या अंडर-१९ व अंडर-१७ संघाचे प्रशिक्षक बिबियानो फर्नांडिस यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो, जीएफडीसी सदस्य सचिव फ्रान्स्क्विना ऑलिव्हेरा, सरपंच अमित मोरजकर, जीएफडीसी सदस्य जॉनी परेरा व बाबली मांद्रेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
टिकलो म्हणाले की, आज फुटबॉल घसरणीच्या टप्प्यात आहे. गोव्याची ओळख असलेला हा खेळ पुन्हा उभारी घेणे ही काळाची गरज आहे. माजी मुख्यमंत्री व संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या दूरदृष्टीतून जीएफडीसीची स्थापना झाली.
आमच्या काळात सुविधा नव्हत्या; आज सुविधा असूनही खेळ मागे पडतोय. हे चित्र बदलण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे. प्रशिक्षक व मैदान कर्मचाऱ्यांसाठी काहीही कमी पडू देणार नाही. बिबियानो फर्नांडिस यांच्या कार्याची त्यांनी विशेष प्रशंसा केली. विवियानो यांनी गोवा व देशाला मान मिळवून दिला आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा आम्हाला अभिमान आहे, असे टिकलो म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व क्रीडामंत्री श्री. रमेश तवडकर यांनी दिलेल्या जबाबदारीबद्दल आभार मानत, जीएफडीसी अंतर्गत असलेल्या सर्व ३६ केंद्रांकडे विशेष लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तांत्रिक संचालकाची नयुक्ती अत्यंत महत्त्वाची असून ती लवकरच केली जाईल, तसेच उत्तर व दक्षिण गोव्यात निवासी पद्धतीच्या अकॅडमी सुरू करून प्रशिक्षणार्थीना शिस्तबद्ध व संरचित प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.