Goa Curchorem Constituency Election | कुडचडेत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

Goa Curchorem Constituency Election | अनपेक्षित घडामोडींना वेग; सोशल मीडिया वाद, पोलिस कारवाईमुळे डोकेदुखी वाढली
Goa Curchorem Constituency Election
Goa Curchorem Constituency Electionfile photo
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने कुडचडे मतदारसंघात अनपेक्षित राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. आमदार नीलेश काब्राल यांच्या बदनामीकारक मीम्स् प्रकरणात खुद्द भाजप कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे संतप्त लोकांनी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेऊन काब्राल यांना उमेदवारी दिल्यास भाजपसाठी काम करणार नाही, असा इशारा दिला आहे.

Goa Curchorem Constituency Election
Goa | कुडचडेच्या राजकारणात नवा रंग

दुसरीकडे कुडचडेच्या ग्रामस्थांनी सांगेचे आमदार आणि राज्य सरकारातील मंत्री सुभाष फळदेसाई यांची भेट घेऊन त्यांनी कुडचडेतून निवडणूक लढवावी, अशी मागणी केल्यामुळे कुडचडे मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुडचडेत सध्या राजकीय राडा सुरू आहे. स्थानिक आमदार निलेश काब्राल यांच्याविषयी अज्ञात व्यक्तींकडून मीम्स तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत.

काब्राल हे काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याच्या या मीम्समुळे त्यांची मतदारसंघात मोठी नाचक्की झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर काब्राल यांनी कुडचडे पोलिस स्थानकात तक्रार दाखल करून मीम्स व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या घटनेची चौकशी करताना काकोडा येथील गौरीश सावंत देसाई या युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

गौरीश सावंत हे भाजप कार्यकर्ते किशन सावंत देसाई यांचे बंधू आहेत. त्यांचे वडीलही भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. गौरीश याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यामुळे त्याचे पडसाद काकोडा भागात उमटले. सावंत देसाई यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या निवासस्थानी भेट देऊन आगामी विधानसभा निवडणुकीत नीलेश काब्राल यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली. काब्राल यांना उमेदवारी दिल्यास कार्यकर्ते त्यांच्यासाठी काम करणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दामू नाईक यांना दिला. या घटनेचे गंभीर पडसाद आता कुडचडे मतदारसंघावर उमटू लागले आहेत.

कुडचडेच्या भाजपात फूट पडल्याचे आता भाजपच्या वरिष्ठांच्या नजरेत आले आहे. दरम्यान, भाजपाच्या काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सांगेचे आमदार तथा समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन कुडचडेच्या राजकीय अस्थिरतेबद्दल त्यांना सूचित करून त्यांनी कुडचडे मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी गळ त्यांना घातली आहे. मात्र फळदेसाई यांनी अद्याप त्यांना होकार कळवला नाही, अशी माहिती प्राप्त झाली आहे. आपला निर्णय पक्ष आणि आपले कार्यकर्ते यांच्यावर अवलंबून असेल असे त्यांनी सूचित केल्याचे कळते. कुडचडे मतदारसंघाच्या शेजारी असलेल्या सांगे मतदारसंघातून फळदेसाई दोन वेळा निवडून आले आहेत.

२०१७ च्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर फळदेसाई यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर सांगे मतदारसंघात भाजपचे कार्य पुढे नेले होते. त्यामुळे भाजपाने २०२२ मध्ये त्यांना पुन्हा उमेदवारी दिली व ते दुसऱ्यांदा निवडून आले. कुडचडे मतदारसंघात इतर मागासवर्गीय म्हणजे भंडारी समाजाचा प्रभाव असून सांगेपेक्षा कुडचडेत गोमंतक भंडारी समाजाचे मतदारही मोठ्या प्रमाणावर आहेत. सुभाष फळदेसाई हे खुद्द मराठा समाजाचे नेते असून वरील दोन्ही समाजांवर त्यांचा चांगला प्रभाव आहे. फळदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे सांगितले. कुडचडे मतदारसंघात आपले असंख्य चाहते आहेत; पण भाजपाचा एकनिष्ठ कार्यकर्ता या नात्याने आपण पक्ष आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, आमदार नीलेश काब्राल यांचे २०२२ मधील प्रतिस्पर्धी आणि माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून उचलबांगडी झाली असून तेही कुडचडेत सक्रिय होत आहेत. भाजपचे रोहन गावस देसाई यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यालय सुरू केले आहे. भाजपच्या उमेदवारीवरून आमदार निलेश कब्राल आणि रोहन देसाई यांच्यात चढाओढ लागलेली असताना अचानक सुभाष फळदेसाई यांच्या कुडचडे प्रवेशाच्या वृत्ताने राजकीय समीकरणे जोराने बदलू लागली आहेत.

Goa Curchorem Constituency Election
Opposition to Casinos in Goa - गोव्यात कॅसिनोला वाढता विरोध

सुभाष फळदेसाईंना कुडचडे चांगला पर्याय

सांगेच्या तुलनेत कुडचडे मतदारसंघ क्षेत्रफळाच्या दृष्टीने अगदी लहान आहे. सुमारे ३३ वर्षांपूर्वी सुभाष फळदेसाई हे कुडचडेतील शिवसेनेचे उमेदवार होते. मात्र, काही कारणांमुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. याची जाण असलेल्या राजकीय जुन्या आणि ज्येष्ठ नेत्यांनी पुन्हा फळदेसाई यांनी कुडचडे मतदारसंघातून निवडणूक लढवावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सविस्तर माहितीनुसार सांगे मतदारसंघ एसटीसाठी राखीव ठेवला जाऊ शकतो. त्यामुळे फळदेसाई यांच्यासाठी कुडचडे मतदारसंघ हा चांगला पर्याय ठरू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.

भाजपमध्येच फूट ?

गौरीश सावंतवर झालेल्या पोलिस कारवाईमुळे संतप्त झालेल्या लोकांनी कुडचडे पोलिस स्थानकात धाव घेऊन पोलिस अधिकाऱ्याकडे त्याच्या अटकेविषयी विचारणा केली. मात्र, पोलिस अधिकारी अपेक्षित उत्तर देऊ शकले नाहीत. इच्छित उत्तर न मिळाल्याने सर्वजण भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या फातोर्डा निवासस्थानी दाखल झाले. आमदार कब्राल यांच्या सांगण्यावरून गौरीश याला विनाकारण अटक करण्यात आल्याचा दावा लोकांनी केला. दामू नाईक यांच्या निवासस्थानी गेलेल्या शिष्टमंडळात भाजपचे पंच सदस्य तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. प्राप्त माहितीनुसार काब्राल यांच्या विरोधात आणखीही गंभीर स्वरूपाच्या तक्रारी लोकांनी दामू नाईक यांच्याकडे केल्या आहेत. दामू नाईक यांनी या विषयात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. पण, या घटनेनंतर कुडचडे मतदारसंघातील भाजपमध्ये मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news