

पणजी : भारतीय जनता पक्षाने 2027 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करताना शुक्रवारी पणजीत मॅरेथॉन बैठक घेऊन सर्व आमदार व मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर समोरासमोर बसून निवडणुकीबाबत प्रगती पुस्तकावर चर्चा केली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांच्यासह पक्षाच्या गाभा समितीचे सदस्य आणि सर्व आमदार मंत्री या दिवसभराच्या बैठकीत उपस्थित राहिले. यावेळी मंत्री व आमदारांच्या गेल्या साडेचार वर्षांतील कामगिरीचा आढावा घेण्यात आला. सादरीकरणासह हा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी निवडणुकांसाठी रणनीती निश्चित करण्यासाठी समोरासमोर चर्चाही केले गेली. मुख्यमंत्र्यांनीही मंत्र्यांशी स्वतंत्रपणे म्हणजेच वन-टू-वन चर्चा केली. मतदारसंघांतील हस्तक्षेप, स्थानिक नेतृत्वातील स्पर्धा, पक्षात नव्याने आलेल्या नेत्यांमुळे बदललेली समीकरणे आणि आगामी निवडणुकीतील उमेदवारी या
मुद्द्यांवर काही मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. भाजपने निवडणुकीची तयारी सुरू करतानाच सर्व आमदार व मंत्र्यांच्या भावनाही जाणून घेतल्या. सरकारच्या योजना, विकासकामे आणि मतदारांपर्यंत पोहोचलेला संदेश यांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावली होती, असेही सांगितले गेले.
रणनीतीच्या दृष्टीनेही चर्चा
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले की, पक्षाने मंत्र्यांच्या गेल्या साडेचार वर्षांतील कामगिरीचा आढावा घेतला. तसेच आगामी निवडणुकांसाठी रणनीतीच्या दृष्टीनेही चर्चा झाली. मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, सहकारी मंत्र्यांना दुपारच्या भोजनासाठी दिलेल्या निमंत्रणाचा हा भाग होता, ही केवळ लंच मीटिंग होती, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.