

पणजी : पुढारी वृत्तसेवा
भारतीय जनता पक्षाने २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. स्वबळावर निवडून येण्याची क्षमता असलेले व इतर काही मंत्री आमदार वगळता भाजपच्या अनेक आमदारांची उमेदवारी येत्या निवडणुकीत असुरक्षित झालेली आहे. किमान दहा ते बारा आमदारांना वगळण्याचे संकेत मिळत आहेत.
२०१२ पासून गोव्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या गोवा सरकारला केंद्रात असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे चांगले पाठबळ मिळत असल्यामुळे गोव्यात अनेक विकासकामे झाली आहेत.
अनेक नवे प्रकल्प उभे राहिलेले आहेत. त्यामुळे राज्यात सरकारविरोधी वातावरण असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात असला तरी पंचायत, पालिका व जिल्हा पंचायत निवडणुकांत भाजपचाच दबदबा राहिलेला आहे. त्यामुळे अनेक नेत्यांना वाटते की येत्या निवडणुकीतही भाजपच पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता असल्याने आपणास भाजप उमेदवारी मिळावी.
सध्याच्या घडीला भाजपच्या आमदारांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आमदार देविया राणे, सांबां खात्याचे मंत्री दिगंबर कामत, क्रीडा मंत्री रमेश तवडकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, महसूल मंत्री बाबूल मोन्सेरात, आमदार मायकल लोबो, मंत्री सुभाष शिरोडकर या नेत्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. इतर काही आमदारांनाही भाजप पुन्हा संधी देण्याची शक्यता आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वीच ४० टक्के आमदार बदलण्याची घोषणा केलेली आहे.
अनेक मतदारसंघांमध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक आहेत. त्यांची पक्षनिष्ठा, सामाजिक काम तपासले जात आहे. जे आमदार पक्षाच्या कामाला वेळ देत नाहीत, ज्यांनी भाजपची विचारधारा अद्यापही स्वीकारलेली नाही, अशा मंत्री व आमदारांची उमेदवारी कापली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे भाजप आमदारांचे धाबे दणाणले आहे.
भाजपमध्ये सध्या असलेले ५० टक्के आमदार हे भाजपच्या हिंदुत्ववादी विचारधारेशी संलग्न नाहीत. काही जण काँग्रेसमधून आलेत. त्यांनी अद्याप भाजपची विचारधारा पूर्णपणे स्वीकारलेली नाही. त्यामुळे भाजपवर 'काँग्रेसयुक्त भाजप' म्हणून टीका होते. ही टीका टाळण्यासाठी भाजप येत्या निवडणुकीत हिंदुत्ववादी विचारधारा असलेल्या व पक्षासाठी तळागाळात काम केलेल्या उमेदवारांचा विचार करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.