

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन (एफडीए) विभागाने बागा-कळंगुट परिसरातील खाद्य व्यावसायिक आस्थापनांवर धडक तपासणी मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान गंभीर अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने पाच रेस्टॉरंट्स तात्पुरती बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
तसेच विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार जणांवर एकूण ६० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी बागा-कळंगुट परिसरातील १२ खाद्य व्यावसायिक आस्थापनांची तपासणी केली.
तपासणीदरम्यान काही ठिकाणी स्वच्छतेचा अभाव, अन्नपदार्थ साठवणुकीतील त्रुटी, स्वयंपाकघरातील अस्वच्छ वातावरण तसेच अन्न सुरक्षा निकषांचे पालन न झाल्याचे निदर्शनास आले. या गंभीर त्रुटींची दखल घेत एफडीएने पाच रेस्टॉरंट्सना तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले.
एफडीएचे अधिकारी रिचर्ड नोरोन्हा यांनी सांगितले की, नागरिक आणि पर्यटकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न मिळावे, यासाठी तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात येत आहे. पुढील आठवड्यापासून रस्त्यालगत खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवरही विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.
पर्यटनस्थळांवरील खाद्य आस्थापनांनी स्वच्छता, अन्न साठवणूक, कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा परवाना निलंबनासह कठोर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही एफडीएने दिला आहे.