

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पिर्ण-बार्देश येथील अष्टगंधा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडमधील तब्बल ११ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात संस्थेचा माजी संचालक प्रकाश कांदोळकर (वय ७०, रा. पार्से, पेडणे याला गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओसी) अटक केली आहे.
यापूर्वी चार संचालकांना अटक झाली होती. त्यामुळे कांदोळकर हा अटक झालेला पाचवा माजी संचालक आहे. या सोसायटीच्या ११ पदाधिकाऱ्यांविरुद्ध या घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यावेळी सोसायटीच्या चार माजी संचालक मंडळाच्या सदस्यांना अटक झाली आहे.
बनावट कागदपत्रांचा वापर करून खोट्या कर्जाना मंजुरी दाखवली जात होती, मात्र प्रत्यक्षात सोसायटीचा निधी पदाधिकाऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यामध्ये वळवण्यात येत होता. गोवा सहकारी संस्था कायद्याचे उल्लंघन करून केलेले अनधिकृत व्यवहार व आर्थिक अनियमितता उघडकीस आल्या होत्या. या प्रकरणात कांदोळकर याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, तो फेटाळण्यात आला होता.