

पणजी : पुढारी वृत्तसेवा
अधिकारी म्हणून नव्हे, तर जनसेवक म्हणून लोकांची कामे करा. पारदर्शकपणे गुणवत्तेवर लोकांची कामे करा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. गोवा कर्मचारी भरती आयोगातर्फे निवडण्यात आलेल्या लेखापाल (अकाऊंटंन्टस) २१ जणांना बुधवारी पर्वरी येथील मंत्रालयात नियुक्तीपत्रे देण्यात आली.
पर्वरी येथील मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही नियुक्तीपत्रे दिली. यावेळी मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, संयुक्त सचिव निशा सावंत व लेखा खात्याच्या संचालक तेरेजा फर्नांडिस उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, गोवा कर्मचारी भरती आयोगातर्फे यापूर्वीही विविध खात्यांमध्ये पारदर्शकपणे गुणवत्तेवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. स्वतःच्या हुशारीने ही पदे युवक युवती मिळवत आहेत. नोकर भरती पारदर्शकपणे होत आहे. हल्लीच सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये अभियंता सारख्या पदावर भरती केली आहे.
नव्याने भरती झालेल्या लेखापालांना प्रशिक्षण दिले जाईल. सीसी कंडक्ट नियम समजून घ्या व काम करा. खुर्चीवर बसल्यानंतर पदाची शान राखा. अधिकारी म्हणून नव्हे तर सेवेकरी होऊन लोकांची कामे करा, अशी सूचना यावेळी डॉ. सावंत यांनी केली.
मुख्यमंत्री म्हणाले, गुणवत्तेवर तुम्ही पद मिळवले आहे. त्यामुळे लोकाना गुणवत्तापुरक सेवा देणे तुमचे कर्तव्य ठरते. इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजीचा वापर सरकारी खात्यांमध्ये करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
नोकरी सेवेचे माध्यम समजून सर्वांनी काम करा
डॉ. कांडावेलू म्हणाले, नोकरी हे सेवेचे माध्यम समजून सर्वांनी काम करावे. राज्याचे आर्थिक व्यवस्थापन अकाऊंटन्टसचा हाती असते. त्यामुळे तुमच्या कामावर राज्याचा आर्थिक डोलारा अवलंबून असतो याची जाणीव ठेवून कर्तव्य पार पाडावे, असे डॉ. कांडावेलू म्हणाले.