

Goa 400 Million Tonnes of Polymetallic Nodules Identified in Indian Ocean
पणजी : हिंद महासागरातील खनिजसंपन्न सुमारे ३ लाख चौरस किलोमीटर क्षेत्र ओळखल्याचा दावा राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्था (एनआयओ) ने केला आहे. खोल समुद्रातील खनिज शोध, सागरी जैवतंत्रज्ञान आणि महासागर तंत्रज्ञानातील ही महत्त्वाची कामगिरी मानली जात आहे. सिंह डॉ. सुनीलकुमार दोनापावला येथील आयोजित एनआयओ कॅम्पसमध्ये जागतिक महासागर दिन कार्यक्रमात एनआयओचे संचालक कुमार सिंह यांनी सांगितले की, श्रीलंकेच्या दक्षिणेला सुमारे १,५०० किमी अंतरावर मध्य हिंद महासागरात सखोल सर्वेक्षण करण्यात आले.
सुमारे ४,००० मीटर खोलीवर 'लकी स्क्वेअर' परिसरात अंदाजे ४०० दशलक्ष मेट्रिक टन पॉलिमेटॅलिक नोड्यूल्सचा साठा आढळून आला आहे. या नोड्यूल्समध्ये सुमारे १०० दशलक्ष टन मँगनीज तसेच तांबे, निकेल आणि कोबाल्ट प्रत्येकी सुमारे ५ दशलक्ष टन प्रमाणात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हे धातू नवीकरणीय ऊर्जा व आधुनिक तंत्रज्ञानासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. पवनऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक पवनचक्कीस मोठ्या प्रमाणात तांबे आवश्यक असते, तर विद्युत वाहने, मोबाईल व इतर उपकरणांमध्येही या धातूंचा वापर होतो, असे डॉ. सिंह यांनी नमूद केले.
ते म्हणाले, एनआयओच्या शास्त्रज्ञांनी जेली फिशपासून वैद्यकीय उपयोगासाठी कोलेजन तयार करण्याच्या पद्धती विकसित केल्या आहेत. तसेच शैवाळाचे खत व इतर मूल्यवर्धित उत्पादनांमध्ये रूपांतर करण्यावरही संशोधन सुरू आहे.
ते म्हणाले, भारताने ६,००० मीटर खोलीवर कार्य करू शकणारे स्वायत्त पाणबुडी वाहन विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे खोल समुद्रातील संशोधन क्षमता अधिक मजबूत होईल. महासागर पृथ्वीवरील जीवनासाठी अत्यावश्यक असून, आपण श्वास घेत असलेल्या ऑक्सिजनपैकी सुमारे निम्मा ऑक्सिजन महासागरातून निर्माण होतो, असेही त्यांनी अधोरेखित केले.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, सागरी संशोधनात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व रोबोटिक्सचा वापर वाढविण्याचे आवाहन केले. भारताची ७,५०० किमी लांबीची किनारपट्टी मत्स्यव्यवसाय, जहाज वाहतूक आणि सागरी जैवतंत्रज्ञानाला आधार देते, तसेच सागरी पवनऊर्जा, भरती-ओहोटी व सागरी औष्णिक ऊर्जा या स्वच्छ ऊर्जा स्रोतांमध्ये मोठी क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले.