

पणजी : देशाच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण टप्पा गाठत चौगुले शिपयार्डने देशातील पहिले स्वदेशी बनावटीचे एअर कुशन व्हेइकल (हॉवरक्राफ्ट) भारतीय तटरक्षक दलाला सुपूर्द केले. खासगी भारतीय शिपयार्डकडून सुरुवातीपासून तयार करून लष्कराला हॉवरक्राफ्ट देण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे.
चौगुले शिपयार्डचे साहाय्यक व्यवस्थापक गौरीश परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा हॉवरक्राफ्टच्या ३८७.४ कोटी रुपयांच्या करारातील ही पहिली डिलिव्हरी असून उर्वरित हॉवरक्राफ्ट पुढील काळात तीन महिन्यांच्या अंतराने सुपूर्द करण्यात येणार आहेत.
या हॉवरक्राफ्टने सागरी चाचण्यांदरम्यान उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. करारानुसार अपेक्षित ४८ नॉटस् वेगाच्या तुलनेत ५२ नॉटस्पर्यंत वेग गाठण्यात यश आले. अधिकृत तांत्रिक तपशीलानुसार या हॉवरक्राफ्टचा कमाल कार्यकारी वेग सुमारे ४५ नॉटस् असून, ८ टन भारवाहक क्षमता, ४२ व्यक्तींना वाहून नेण्याची क्षमता आणि सुमारे ९ तास कार्यरत राहण्याची क्षमता आहे.
या हॉवरक्राफ्टमध्ये ५० टक्क्यांहून अधिक स्वदेशी उपकरणांचा समावेश असून, डिलिव्हरीनंतर पुढील पाच वर्षे त्याची देखभाल व दुरुस्ती चौगुले शिपयार्डमार्फत केली जाणार आहे. उथळ पाणी, चिखलयुक्त प्रदेश, नदीकिनारे आणि किनारी भागात जलद तैनातीसाठी हे वाहन विशेषतः उपयुक्त आहे. पारंपरिक जहाजांच्या मर्यादा ओलांडत ते किनारी निगराणी, शोध व बचाव मोहीम, सागरी कायद्याची अंमलबजावणी आणि आपत्कालीन प्रतिसादासाठी प्रभावी ठरणार आहे.
ही हॉवरक्राफ्ट पश्चिम बंगालमधील हल्दिय येथे तैनात केली जाणार असून, पूर्व भारतातील नदीकिनारी भाग, त्रिभुज प्रदेश तसेच पूर मदत व मानवतावादी मोहिमांमध्ये ती महत्त्वाची भूमिक बजावेल.
हॉवरक्राफ्ट कसे कार्य करते ?
हॉवरक्राफ्ट हे 'एअर कुशन व्हेइकल' असून ते पाण्यावर किंवा जमिनीवर थेट न चालता हवेच्या दाबावर तरंगत पुढे सरकते. यामध्ये शक्तिशाली फॅन्सद्वारे खालील बाजूस उच्च दाबाची हवा फेकली जाते, ज्यामुळे वाहन आणि पृष्ठभाग यांच्यात 'एअर कुशन' तयार होते. त्यामुळे घर्षण कमी होऊन ते पाणी, चिखल, वाळू किंवा सपाट जमिनीवर सहजपणे चालू शकते. दिशानियंत्रणासाठी प्रोपेलर व रडरचा वापर केला जातो. या वैशिष्ट्यांमुळे दुर्गम, उथळ आणि पारंपरिक नौकांसाठी अवघड भागातही हॉवरक्राफ्ट प्रभावीपणे कार्य करू शकते.