

दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
गणेश चतुर्थी म्हटली की गोमंतकीयांच्या घराघरांत भक्तिरसाची उधळण आणि गावागावांत घुमणारा घुमट आरतीचा नाद हे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. याच पार्श्वभूमीवर घुमट आरतीच्या सरावाला सर्वत्र जोर आला आहे. घुमट वादनाची समृद्ध सांस्कृतिक परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी मुरगाव तालुक्यातील विविध संस्थांनी पुढाकार घेतला असून, घुमट आरती मंडळांना घुमट वादनाचे धडे दिले जात आहेत.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही सराव जोमाने सुरू आहे. गोव्याच्या गणेश चतुर्थी उत्सवाला धार्मिक श्रद्धेसोबतच समृद्ध लोककलेची परंपरा लाभली आहे. चतुर्थीच्या दिवसांत गावागावांत घुमट, समेळ आणि कासाळ्यांच्या तालावर पारंपरिक आरत्या व भजनांचा गजर होतो.
बदलत्या काळात ही परंपरा लोप पावू नये आणि युवा पिढीला या लोककलेची गोडी लागावी, या उद्देशाने विविध भागांत आणि संस्थांतर्फे पारंपरिक घुमट, समेळ व कासाळे वादनाचे प्रशिक्षण दिले जात आहे. लोकप्रतिनिधींकडूनही विविध घुमट आरती मंडळांना घुमट वाद्यांचे वितरण केले जात आहे.
यामुळे यंदाच्या गणेश चतुर्थींत गावागावांतील पारंपरिक आरती-भजनांना नवे बळ मिळणार असून, गोमंतकीय लोकसंस्कृतीचा भक्तिमय नाद आणखी जोमाने घुमणार आहे.
गोव्याची भजन आणि घुमट आरतीची परंपरा ही केवळ मनोरंजनाची साधने नसून आपल्या संस्कृतीची ओळख आहे.
पूर्वजांनी जपलेला हा अमूल्य सांस्कृतिक वारसा पुढील पिढीकडे सोपविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. गावागावांतील युवा कलाकारांनी घुमट वादन, भजन आणि पारंपरिक आरतीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन लोकप्रतिनिधींकडून करण्यात आले आहे.